Breaking News

पंतप्रधानांच्या हस्ते डॉ. आंबेडकरांच्या स्मृत्यर्थ नाण्यांचे अनावरण

modi
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांच्या स्मृत्यर्थ दोन नाण्यांचे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनावरण केले.
दहा आणि १२५ रुपये मूल्याच्या दोन नाण्यांचे आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त अनावरण करण्यात आले.
डॉ. आंबेडकर हे महापरिनिर्वाणाच्या 60 वर्षांनंतरही स्मरण केल्या जाणाऱ्या मोजक्या व्यक्तींपैकी एक होते. भारतापुढील आजच्या काळात समस्यांचा विचार करताना जितके बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण करावे, तितकी त्यांची दूरदृष्टी दिसून येते, डॉ. आंबेडकरांबाबत तितकाच अधिकाधिक सन्मान वाटतो, असे उद्गार यावेळी मोदींनी केले.
बाबासाहेबांचे सामाजिक न्यायाच्या बाबतीत जितके योगदान उल्लेखनीय आहे, तितकेच आर्थिक समतेबाबत त्यांचे विचार वाखाणण्याजोगे असल्याचेही मोदी म्हणाले. देशात आंबेडकर आणि भारतीय संविधानाबाबत चर्चा होणे आवश्यक आहे, २६ नोव्हेंबरचा संविधान दिवस हे त्यादृष्टीने टाकलेले पाऊल आहे, असेही मोदींनी सांगितले.
महिला सक्षमीकरण, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील बाबासाहेबांच्या कार्याबाबतही मोदींनी कौतुकोद्गार काढले. यावेळी अर्थमंत्री अरुण जेटली आणि सामाजिक न्यायमंत्री थावर चंद गेहलोतही उपस्थित होते.