Breaking News

विधान परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर

vidhan-sabha


मुंबई : नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीच्या सर्व सात जागांचे निकाल जाहीर झाले असून काँग्रेसने सातपैकी ३ जागी विजय मिळवला आहे. तर शिवसेना २, राष्ट्रवादी आणि भाजपला प्रत्येकी एका जागी यश मिळाले आहे.
मुंबईतील विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी निवडणूक झाली. यात मुंबईतून शिवसेनेचे रामदास कदम आणि काँग्रेसचे भाई जगताप विजयी झाले आहेत. तब्बल ८५ मतांनी शिवसेनेचे रामदास कदम विजयी झाले आहेत. विधानपरिषदेवरील विद्यमान आमदार असलेल्या काँग्रेसच्या भाई जगताप यांना ५८ मते मिळाली. तर जगताप यांच्यापेक्षा केवळ २ मते कमी लाड यांना मिळाल्यामुळे भाई जगताप यांना निसटता विजय झाला.
तर दुसरीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर विधानपरिषद मतदारसंघात काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी बाजी मारत काँग्रेसचेच बंडखोर उमेदवार महादेवराव महाडिक यांचा सतेज उर्फ बंटी पाटील यांनी ६३ मतांनी पराभव केला. काँग्रेसचे उमेदवार अमरीश पटेल यांनी धुळे- नंदुरबार मतदारसंघात भाजपच्या शशीकांत वाणी यांचा एकहाती पराभव केला. पटेल यांना ३८३ पैकी तब्बल ३५३ मते मिळाली, तर शशीकांत वाणींच्या पदरात अवघी ३१ मते पडली.
भाजप पुरस्कृत प्रशांत परिचारक यांनी सुरुवातीपासूनच चुरस निर्माण झालेल्या सोलापूर मतदारसंघात बाजी मारली. त्यांनी राष्ट्रवादीचे दीपक साळुंखे यांचा १४१ मतांनी पराभव केला. अकोल्यामध्ये शिवसेनेने भगवा फडकवला आहे. सेनेच्या गोपीकिशन बाजोरिया यांनी तब्बल ५१३ मतांनी मोठा विजय मिळवला. त्यांनी राष्ट्रवादीच्या रवींद्र सपकाळ यांचा पराभव केला. अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये चुरस होती. मात्र राष्ट्रवादीच्या अरुण जगताप यांनी २४४ मतांसह विजय खेचून आणला. त्यांनी शिवसेनेच्या शशीकांत गाडे यांचा पराभव केला.