Breaking News

रणरागिणींची अमेरिकी लष्करात भरती

millitary
वॉशिंग्टन : अमेरिकेत आता शत्रू पक्षावर तुटून पडणा-या जवानांच्या जागी शस्त्रसज्ज महिलाही दिसतील. यात रणगाडे चालविण्यासह शत्रू पक्षावर तोफगोळ्यांचा मारा करण्यासह पायदळाचे नेतृत्वही महिलांकडे येऊ शकेल. अर्थातच युद्धस्थितीत या महिला कोणतीही आघाडी सांभाळू शकतील. अमेरिकी लष्कराने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. अध्यक्ष बराक ओबामा यांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे.
पेंटागॉनच्या पत्रकार परिषदेत संरक्षणमंत्री अ‍ॅश्टन कार्टर यांनी ही घोषणा केली. ओबामा प्रशासनाने गेल्या ७ वर्षांत लष्करामध्ये महिलांना संधी देण्याच्या दिशेने पावले उचलली होती. तरीही पायदळ, चिलखत, शत्रूच्या हालचाली टिपणारी फळी आणि विशेष मोहिमांसह लष्करातील ७ क्षेत्रांत अद्याप महिलांना संधी दिली गेली नव्हती. आता या सर्वच आघाड्यांवर महिला काम करू शकतील. या निर्णयानुसार, महिलांना अशा पदांतील १० टक्के जागांवर नेमणूक दिली जाणार आहे.
कार्टर म्हणाले, लष्करात आता कोणताही विभाग महिलांसाठी खुला असेल. एखादी महिला लष्करातील पदासाठी पात्र असेल तर तिला त्या पदावर नेमणूक दिली जाईल शिवाय आमच्या कोणत्याही धाडसी मोहिमेत त्या सहभागी होऊ शकतील.