Breaking News

जुन्या बेवारस वाहनांतून मिळाले १o लाख सुपा पोलीस ठाण्यात झाला लिलाव



सुपा I प्रतिनिधी

पारनेर तालुक्यात सुपा पोलिस ठाण्यात गेल्या दहा वर्षांपासून अनेक वाहने पडून होती. सन २०१० च्या आधी सुप्याचा कारभार पारनेर पोलिस ठाण्यांतर्गत चौकीमार्फत चालत होता. तेव्हापासून महामार्गवर बेवारस वाहने मिळून येत होती. अखेर सर्व गाड्यांचा लिलाव २६ जून रोजी दुपारी करण्यात आला. या लिलावातून शासनाला १० लाखांची रक्‍कम मिळाली. 

नगर-पुणे महामार्गाशेजारी सुपा येथे पोलिस ठाण्याची स्थापना मे २०१० साली करण्यात आली होती. मात्र जागेची अडचण भासू लागल्याने औद्योगिक वसाहतीत नव्याने पोलिस ठाण्याची इमारत बांधून कामकाज सुरळीत झाले. मात्र जुन्या पोलिस ठाण्यात बेवारस गाड्यांचा खच पडलेला होता. सर्व कंपन्याच्या ७६ मोटारसायकली, चारचाकी ७ वाहने व एक कंटेनरचा यात समावेश होता. सन २०१३ मध्ये वाडेगव्हाण शिवारात पाच कंटेनर भरून अनधिकृत चंदन साठा पोलिसांनी पकडला होता. त्यातील सर्व आरोपी पारनेर तालुक्यातील होते. कंटेनर मालकाचा शोध लाऊन न्यायालयामार्फत टेंन्डर देण्यात आले होते. त्यातील एक कंटेनर बेेवारस राहिल्यामुळे तो पोलिस ठाण्यात पडून होता. पोलिस प्रशासनाने या बेवारस वाहनांचा लिलाव केला. जिल्ह्यातील ३६ व्यापार्‍यांनी त्यात सहभाग नोंदविला. 

श्रीरामपूर भागातील राजू शहा यांनी १० लाख रुपयांना लिलाव घेतला. यावेळी सहाय्यक पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया, पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील, सहाय्यक फौजदार तुकाराम काळे आणि नागरिक उपस्थित होते. बेवारस वाहनांच्या लिलाव प्रक्रियेमुळे जुन्या पोलिस ठाण्याचा श्‍वास मोकळा होणार आहे. पोलिस ठाणे औद्योगिक वसाहतीत गेल्यामुळे जुने पोलिस ठाणे ओस पडले आहे. नव्याने सुशोभिकरण करून ते वापरात आणावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.