Breaking News

कत्तलीसाठी गायींसह वासरांची सुटका


।संगमनेर / प्रतिनिधी।

कत्तलीच्या उद्देशाने चार चाकी वाहनातून तीन जर्शी गायी व पंधरा वासरांना नेत असताना त्यांची सुटका करण्यात संगमनेर तालुका पोलिसांना यश आले. पोलीस निरीक्षक पाटील यांना मिळालेल्या खबऱ्यामार्फत मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. 

तालुक्यातील वडगावपान शिवारातून गोवंश जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक केली जात होती. त्यानुसार पो. नि. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. खेडकर व पोहेकॉ. आवटी यांनी सदरील कारवाई केली. शुक्रवारी {दि. २९} रात्री नऊच्या सुमारास वडगावपान शिवारातील टोलनाक्याजवळ शाहरुख गंभीर शाह ( रा. ममदापूर, ता. राहता) व शाकीर मुन्ना शाह ( रा. ममदापूर ता. राहता) हे दोघे तीन जर्शी गायी आणि पंधरा वासरांची एका पांढऱ्या रंगाच्या पिकअप वाहनातून (क्र. एमएच ०४ ईएल ८३२)वाहतूक करीत होते. पोलिसांनी यावेळी पंधरा हजार रुपये किंमतीची तीन जर्शी गायी, पंधरा वासरे आणि तीन लाख रुपये किंमतीची पांढऱ्या रंगाची पिकअप जप्त करून आरोपींना अटक केली.

तालुका पोलीस ठाण्यात पो. कॉ. अण्णासाहेब डाके यांच्या फिर्यादीवरून दोघंही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षक कायद्यानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली. आज दि. ३० रोजी आरोपींना न्यायालयासमोर हजर केले. त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.