जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे २४ कोटी ८० लाख देण्याची खासदार ए.टी.नाना पाटील यांची मागणी
नवी दिल्ली : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा उतरविणा-या जळगाव जिल्ह्यातील १६ हजार ७५७ शेतकऱ्यांना त्यांच्या वाट्याची २४ कोटी ८० लाखांची रक्कम लवकर प्रदान करण्यात यावी अशी मागणी जळगावचे खासदार ए.टी.नाना पाटील यांनी आज केंद्रीय कृषी तथा शेतकरी कल्याण मंत्री राधामोहन सिंह व केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांना निवेदनाद्वारे केली आहे.
श्री. पाटील यांनी कृषी भवन येथे आज श्री . राधामोहन सिंह यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सोपविले. या निवेदनात म्हटले आहे, वर्ष २०१७ मध्ये ‘प्रधानमंत्री पीक विमा योजने’अंतर्गत जिल्ह्यातील ७२ हजार २५४ शेतक-यांनी पीक विमा उतरविला व प्रिमियमची रक्कमही भरली. वर्ष २०१७ च्या खरीप हंगामात निसर्गाच्या प्रकोपामुळे शेतीचे नुकसान झाले, परिणामी जिल्ह्यातील ३४ हजार १६७ शेतक-यांनी ४४ कोटी ७१ लाखांच्या मोबदल्यासाठी अर्ज दाखल केले. मात्र, विमा कंपनीकडून गेल्या वर्षभरापासून यातील १६ हजार ७५७ शेतक-यांना त्यांच्या वाट्याची २४ कोटी ८० लाखांची रक्कम मिळालेली नाही. दरम्यान, श्री. पाटील यांनी केंद्रीय अर्थमंत्री श्री. गोयल यांना आज या मागणी संदर्भात निवेदन सोपविले आहे.
खरीपाचा हंगाम सुरु झाला असून मशागत व पेरणीसाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज पाहता त्यांना विम्याची रक्कम तात्काळ मिळणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या पीक विम्याचे पैसे मिळावे त्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री व केंद्रीय अर्थमंत्री यांनी संबंधितांना आदेश करावे व जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी श्री. पाटील यांनी केली आहे.