कापूस पिकाच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी फेरोमन ट्रॅप बसविण्यात सक्रिय सहभाग घेण्याचे कृषिमंत्र्यांचे आवाहन
नागपूर : शेतकऱ्यांनी कापूस पिकाच्या क्षेत्रावर फेरोमन ट्रॅप (कामगंध सापळे) बसवून कापूस पिकाचे संरक्षण करावे. यामध्ये शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा. या सापळ्यात शेंदरी बोंडअळी, त्याचा कोष किंवा पतंग आढळून आल्यास कृषी सहायक, कृषी विज्ञान केंद्राचे वैज्ञानिक यांच्याकडे तातडीने माहिती द्यावी, असे आवाहन कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.
श्री. पाटील यावेळी म्हणाले, यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी तालुक्यातील स्वस्तिक जिनिंग मिल व बजरंग जिनींग मिल मध्ये फेरोमन ट्रॅप बसविण्यात आले होते. त्यात गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेंदरी बोंड अळीचे सुमारे 26 पतंग आढळून आले आहेत. तसेच, अमरावती जिल्ह्याच्या नेमामी व लोंढा जिनिंग मिलमध्ये 26, अकोला येथील जे. एस. कॉटन, केडिया, पद्मावती, जस्मनीत जीनिंग मिलमध्ये देखील सेंदरी बोंडअळीचे सुमारे 44 पतंग आढळून आले आहेत.
शेतकऱ्यांनी फेरोमन ट्रॅप बसवून कापूस पिकाचे रक्षण करावे, असे आवाहन कृषिमंत्र्यांनी यावेळी केले.