Breaking News

मुले पळविणार्‍या अफवांवर विश्‍वास ठेवू नका.

ग्रामिण भागात मुले पळविणार्‍या टोळ्या सक्रिय झाल्याच्या अफवांमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र या सर्व अफवा असून अशा व्यक्ती आढळल्यास सुपा पोलीसांकडे संपर्क साधण्याचे आवाहन सुपा पोलिस निरिक्षक राजेंद्र पाटील यांनी केले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अलीकडील काही दिवसांपासून जिल्ह्यात शेजारीत जिल्ह्यात व राज्यात लहान मुलांना पळवून नेणारी टोळी आली असून, ती लहान मुलांना पळवून नेत असल्याबाबत समाजकंटकांकडून अफवा पसरविली जात आहे. काही ठिकाणी कोणतीही शहानिशा न करता निरपराधांवर हल्ले होवून वाहनांची जाळपोळ करून, लोकांना मारून टाकण्यापर्यंतच्या गंभीर घटना घडत आहेत. नंतर अशा घटनांमध्ये सदर व्यक्ती निरपराध, कामानिमित्ताने आलेले निष्पन्न होवून हल्लेखोरांवर गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल झाले.
यानिमित्ताने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात की, अशा प्रकारची कुठलीही टोळी कार्यरत नसून, लहान मुले पळविण्याची एकही घटना आपल्या जिल्ह्यात किंवा शेजारील जिल्ह्यात घडलेली नाही, तशी पोलीसात देखील नोंद नाही. अशा प्रकारच्या अफवा समाजातील काही समाजकंटक जाणीवपूर्वक पसरवून समाजातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आणत आहेत. जनतेने अशा अफवांना बळी न पडता सत्यता पडताळून पाहावी. शंका आल्यास कायदा हातात न घेता त्वरित संबंधीत पोलीस स्टेशन, गावातील पोलीस स्टेशन, पोलीस मित्र, प्रतिष्ठित व सुजान नागरिकांना सुचित करावे.
अशा प्रकारे मेसेज सोशल मिडियावर फॉरवर्ड करणे हा गुन्हा आहे. परिसरात संशयित व्यक्ती आढळून आल्यास सुपा पोलीस स्टेशन फोन नं. 02488,213233 यावर संपर्क साधण्याचे आवाहन देखील सुपा पोलीसांच्या वतीने करण्यात आले आहे.