Breaking News

पत्रकार संघाने घेतले मेहेंदुरी गाव दत्तक गावाचा कायापालट करण्याचा निर्धार

ग्रामीण भागातील गावाच्या विकासाला चालना मिळावी, या उदात्त हेतूने महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने अकोले तालुक्यातील मेहेंदुरी हे गाव दत्तक घेण्यात आले आहे.तीन महिन्यांच्या कालावधीत या गावाचा कायापालट करण्याचा संकल्प पत्रकार संघाच्या सदस्यांनी केला आहे.
पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. मात्र हल्ली पत्रकारांकडे बघण्याचा सर्वसामान्य नागरिकांचा दृष्टीकोन बदलला आहे.अनेक पत्रकार संघटना राज्यात-देशात कार्यरत आहेत. पत्रकारांकडे सर्वसामान्य नागरिकांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलावा, हा स्वच्छ हेतू मनात ठेवून महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ अकोले तालुक्याच्या वतीने मेहेंदुरी हे गाव दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. पत्रकार संघाच्या या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद देत मेहेंदुरी ग्रामपंचायतीने पत्रकार संघाला तीन महिने गाव दत्तक देत असल्याचे अधिकृत पत्र दिले. गाव दत्तक घेत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर पत्रकार संघाच्या सदस्यांनी मेहेंदुरी गावाला सदिच्छा भेट देवून संपूर्ण गावाची पाहणी केली. यावेळी गावच्या सरपंच रुपाली संगारे, ग्रामसेविका अनुराधा शेलार, ग्रामपंचायत सदस्य डॉ. अविनाश कानवडे, सुनील बंगाळ यांनी पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांचे स्वागत केले. पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष गणेश आवारी, सचिव अमोल शिर्के, खजिनदार सचिन लगड, अकोले शहराध्यक्ष शशिकांत सरोदे, प्रवरा विभाग प्रमुख शंकर संगारे आदी सदस्यांनी गावाला भेट दिली.
प्रारंभी राज्य शासनाच्या वृक्ष लागवड उपक्रमात सहभागी होवून पत्रकार संघाच्या सदस्यांनी ग्रामस्थांसोबत वृक्षारोपण केले. यावेळी ग्रामस्थांनी पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांना गाव परिसर फिरवून दाखवीत गावाची सविस्तर माहिती दिली. गावातील मंदिरे, शाळा, माध्यमिक विद्यालय, अंगणवाडी, सोसायटी, पाण्याची टाकी, सभामंडप, गावातील अंतर्गत रस्ते आदींची जागेवर जावून ग्रामस्थांनी सदस्यांना माहिती दिली. तीन महिन्यांच्या कालावधीत गाव परिसराचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्णय पत्रकार संघाने घेतला आहे. पत्रकार संघाच्या या उपक्रमात मेहेंदुरी ग्रामस्थ देखील अग्रक्रमाने सहभागी होतील, असा शब्द ही ग्रामस्थांनी पत्रकार संघाला दिला. पत्रकार संघाच्या वतीने गावातील मुख्य रस्त्यांवर वृक्षारोपण करून स्वछता अभियान राबविण्यात येणार आहे. तसेच गावातील दर्शनी भागात असलेल्या भिंतींवर शालेय मुलांच्या ज्ञानात भर पाडणारे गणिताचे सूत्र, सुविचार, महात्म्यांची छायाचित्रे काढण्यात येणार आहेत. शाळेच्या इमारतींवर उपयुक्त असा माहिती संग्रह रेखाटण्यात येणार आहे. गावाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गावाची माहिती दर्शविणारा नकाशा, यासारखे अनेक उपक्रम या गावात राबविले जाणार आहेत. 


कोट - खेड्याकडे चला, या महात्मा गांधींच्या संदेशाचा पत्रकार संघाच्या सदस्यांवर पगडा आहे. नुसते खेड्याकडे न जाता, खेड्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, अशी पत्रकारांची मनोमन इच्छा आहे. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी पत्रकार संघाने मेहेंदुरी हे गाव दत्तक घेतले आहे. या गावाचा कायापालट करण्याचा ध्यास युवा पत्रकारांनी हाती घेतला आहे. या गावचे काम यशस्वी मार्गी लागल्यानंतर लगेचच दुसरे गाव दत्तक घेतले जाणार आहे. 
-अमोल शिर्के, सचिव पत्रकार संघ