‘गोदावरी’ ओहरफ्लोचे पाणी साठवन तलावात सोडा : मागणी
राहाता प्रतिनिधी
गोदावरीचे ओहरफ्लोचे पाणी गोदावरी कालव्यांना सोडून खरिप पिकांबरोबर साठवन तलावात पाणी सोडावे, अशी मागणी गोदावरी कालवे संघर्ष कृती समितीने नाशिक जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे, गोदावरी कालवे लाभक्षेत्रात गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने राहाता परिसरात अद्याप खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. जे पेरले ती पिके पाण्याअभावी सुकू लागली आहेत. लाभक्षेत्रात अवघा १५० मिलीमीटर पावसाची नेांद झाली आहे. पिकांना पाण्याची गरज असून तातडीने पाणी न मिळाल्यास पिके जळून जातील आणि दुबार पेरणीचे संकट उभे राहील सुदैवाने धरण परिसरात चांगला पाऊस पडत असून धरण अर्धे भरून गोदावरीला ओहरफ्लो सोडन्यात आला आहे. मात्र कालवे बंद आहेत. या कालव्यांनाही हे ओहरफ्लोचे पाणी सोडावे व पिकांना द्यावे, अशी मागणी गोदावरी कालवे संघर्ष समितीचे राजेंद्र बावके, सुनिल सदाफळ, संजय बोठे, विजय बोरकर, बाळासाहेब दंडवते, प्रदिप कोल्हे, प्रविण सदाफळ, राजेंद्र गोर्डे आदींनी केली आहे.