Breaking News

गोरगरिबांना मोफत दूध वाटपाचे आंदोलन उत्साहात


संगमनेर / प्रतिनिधी

येथील दूध बंद आंदोलन कृती समितीच्यावतीने तहसील कार्यलयाजवळ गोरगरिबांना मोफत दूध वाटप करून अभिनव आंदोलन करण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी पुकारलेल्या दूध बंद आंदोलनास संगमनेर तालुक्यातील दूध उत्पादकांनी शंभर टक्के पाठिंबा देत आंदोलन यशस्वी केले. 

संगमनेर तालुका दूध संघासह एस आर दूध संघ, किल्ले गगनगड दूध संघ, श्रमिक मिल्क, रंजन मिल्क या खाजगी दूध संघांनीसुद्धा या दूध बंद आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. यावेळी तालुक्यातील सर्व दूध संकलन बंद ठेवण्यात आले होते. ज्या शेतकऱ्यांचे दूध आले, ते गोरगरिबांना मोफत वाटण्यात आले. दरम्यान, दूध बंद आंदोलन कृती समितीच्यावतीने तालुक्यातील कोल्हेवाडी येथील भगतसिंग दूध संस्थेच्यावतीने राहुल दिघे, अमोल दिघे, सतीश वाळुंज, बंडू गुंजाळ यांनी आणलेले चार ते पाच कॅन दूध तहसील कार्यालयालगतच्या झोडपट्टीतील गोरगरीब नागरिकांना वाटण्यात आले. 

राज्य सरकार जोपर्यंत दुधाला प्रतिलिटर पाच रुपये म्हणजे २७ रुपये लिटरला भाव देत नाही, तोपर्यंत आमचे मोफत दूध वाटपाचे हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा दूध बंद कृती समितीचे शरदनाना थोरात, संतोष रोहम, रावसाहेब डुबे, दिपक वाळे, राहुल दिघे, अमर कतारी यांनी दिला. या आंदोलनात राजाभाऊ देशमुख, सदाशिव हासे, प्रशांत वामन, वसंत डुबे, बाळासाहेब जोर्वेकर आदी उपस्थित होते.