Breaking News

‘नाजूक’ कारणातून झाला ‘त्या’ महिलेचा खून

राहुरी विशेष प्रतिनिधी.

तालुक्यातील वळण परिसरात एका ३२ वर्षीय महिलेच्या खूनाचा उलगडा झाला आहे. सदर मयत महिलेची ओळख पटली असून यात संशयित असलेल्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, या महिलेचा खून ‘नाजूक’ कारणावरून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. 

संगमनेर येथील ज्योती राधाकृष्ण सातपुते या महिलेचा दोन दिवसांपूर्वी वळण शिवारात मृतदेह आढळून आला होता. य महिलेचा खून करून मृतदेह काटवणात आणून टाकण्यात आला होता. बाबासाहेब उर्फ गणेश गोसावी याने तिचा खून केल्याचे पोलिसात निष्पन्न झाले. या महिलेची ओळख पटत नसल्याने पोलिसांना तपास करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती. मात्र सोशल मिडियावर मयत महिलेचा फोटो व माहिती व्हायरल होताच महिलेच्या खूनाचा उलगडा करण्यास पोलिसांना मदत झाली. दरम्यान, या संबंधित असलेल्या संगमनेर येथील चौघांना पोलिसांनी चौकशीसाठी त्यांच्या राहत्या घरातून उचलले. या चौघांची पोलिसांनी कसून चौकशी केली. या चौघांपैकी गणेश गोसावी याने या महिलेचा खून केल्याचे उघड झाले.

दरम्यान, मयत महिलेच्या नातेवाईकांनी सांगितले, मयत ज्योती सातपुते ही रहस्यमय गायब झाली होती. जातांना मोबाईलमध्ये रिचार्ज करून येते, असे मुलांना सांगितले. संगमनेर येथील राधाकृष्ण सातपुते याच्याबरोबर तिचा विवाह झाला होता. मयत ज्योतीचे माहेर नाशिकमधील चरणनदासनगर येथे आहे. ज्योती हिस १६ व ११ वर्षांची दोन मुले आहेत. तिचा पती वाहन चालक असल्याने कायम बाहेर असतो. दरम्यानच्या काळात मयत ज्योतीने एका गवंडीकाम प्रेमसंबंध आले. त्या दोघांनी श्री क्षेत्र आळंदी येथे जाऊन विवाह केला होता. काही दिवसानंतर त्या तरुणाशीही ज्योतीचा वाद झाला होता. त्यामुळे हे दोघे गेली दोन ते अडीच वर्षापासून बोलत नव्हते. यामधे गणेश गोसावी याच्याशी तिचे ‘नाजूक’ संबध आले. गणेश व ज्योतीचे अनेकवेळा वाद झाले. गणेश याच्याविरोधात तिने नाशिक पोलिस ठाण्यात मारहाण व दमबाजीची तक्रारही दाखल केली होती. या ‘नाजूक’ संबंधातून तिचा खून झाला असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. 

या खूनाचा छडा लावण्यासाठी अप्पर पोलिस अधिक्षक रोहिदास पवार, पोलिस उपधिक्षक सोमनाथ वाघचौरे हे राहुरी पोलिस ठाण्यात ठाण मांडून होते. पोलिस निरिक्षक अविनाश शिळीमकर, पोलिस उपनिरिक्षक सतिश शिरसाठ यांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची कसून चौकशी केली आणि या खूनाचा उलगडा झाला.