Breaking News

‘प्रवरा’च्या शाळा ‘डिजिटल’ करण्याचे धोरण : विखे

प्रवरानगर प्रतिनिधी

सामान्य माणसाच्या विकासासाठी अखेरच्या श्वासापर्यंत विविध प्रकारच्या योजना राबविण्याऱ्या खा. बाळासाहेब विखे यांनी खेड्यामध्येच शिक्षणाचा विस्तार केला. त्यांचा आदर्श घेत आडगाव ग्रामस्थांनी शाळांच्या खोल्याचे काम केले. आगामी तीन वर्षांत प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सर्व शाळा डिजिटल क्लास रूमयुक्त करण्याचे धोरण हाती घेतले आहे. याची सुरुवात आडगाव येथील प्रवरा माध्यमिक विद्यालयापासून करणार आहोत, अशी माहिती विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी दिली.

पद्मभूषण डॉ. माजी खा. बाळासाहेब पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आडगाव येथे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, स्नेहभोजन व नवीन वर्गखोल्यांचे उघाटन हा कार्यक्रम पार पडला. त्याचप्रमाणे आडगाव बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या खत डेपो विक्रीचा शुभारंभ विरोधीपक्ष नेते विखे यांच्या उपस्थितीमध्ये याप्रसंगी पार पडला. यावेळी ना. विखे पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी मुरलीधर शेळके होते. या कार्यक्रमास बाजार समितीचे सभापती बापूसाहेब आहेर, उपसभापती बाबासाहेब म्हस्के, स्कूल कमिटीचे अध्यक्ष कोंडीराम शेळके, सरपंच मनीषा लहामगे, एस. व्ही. शेळके, सारंगधर शेळके, सीताराम शेळके. तहसीलदार आहेर, गटविकास अधिकारी शेवाळे, संपतराव दंडवते, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, शिक्षणाधिकारी प्रा. शिवाजी रेठरेकर, प्रा. विजय आहेर आदी उपस्थित होते. रामदास जाधव यांच्यावतीने गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. प्रारंभी मुख्याध्यापक मुश्ताक शेख यांनी प्रास्ताविक केले.

इयत्ता दहावीच्या परीक्षेत केंद्रात प्रथम आलेल्या मयूरी शेळके, स्वप्नील शेळके आणि रविंद्र शेळके यांचा तसेच शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या दिव्या भारस्कर आणि हर्षल लावणारे यांचा यावेळी विखेंच्या हस्ते सन्मान करण्यात आला.