शेतकर्यांचे डोळे लागले आकाशाकडे
पावसाळा सुरु होवून एक महिन्यांचा काल उलटला तरी, कर्जत तालुक्यात अद्याप पावसाला सुरुवात झालेली नाही. तालुक्यात सर्वदूर पाऊस झाला नसल्याने, खरिपाच्या पेरण्या झालेल्या नाहीत. तर ज्या भागात थोडाफार पाऊस झालेला असताना शेतकर्यांनी घाईघाईने खरिपाच्या पेरण्या उरकून घेतल्या. ती पिके पावसाअभावी करपून चालली आहेत. त्यामुळे कर्जत तालुक्यातील शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट आलेले आहे. पावसाच्या भरवश्यावरच येथील शेतकरी खरिपाच्या पेरण्या करत असतात. तालुक्यातील बहुतांशी भागात पावसाने पाठ फिरविली आहे. त्यामुळे ज्या शेतकर्यांनी पेरण्या केल्या नाहीत तेही, अडचणीत तर ज्यांनी कमी पावसावर पेरण्या केल्या आहेत. ते तर आणखीनच अडचणीत आलेले आहेत. खरिपाच्या पेरण्या सर्वत्र अद्यापही सुरु होऊ न शकल्याने खरीपातील मूग, उडीदसारखी पिके घेण्याची वेळ निघून गेलेली आहे.