Breaking News

मुद्रा लोन प्रकरणी मानहानीची तक्रार

सेंट्रल बँक ऑफ इंडीया शाखा पळशी शाखाधिकारी यांनी मुद्रा लोन नाकारण्यासाठी खोटे कारण दाखवुन, मानहानीपर मुद्दे देवून माझी समाजातील प्रतिमा मलीन केली. त्याबाबत त्यांच्यावर फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यासाठी संतोष बबन केदारी यानी थेट पोलीस अधिक्षक अहमदनगर यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. 

सेंट्रल बँक ऑफ इंडिया पळशी शाखेचे शाखाधिकारी यांनी संतोष बबन केदारी मु. वनकुटे, ता. पारनेर यांचे मुद्रा लोन नाकारल्याने केदारी यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज केला आहे. 
तक्रार अर्जामध्ये म्हटले आहे की, आपण कापड दुकानासाठी मुद्रा लोन मंजुरीसाठीची फाईल शाखाधिकारी दत्ता थोरात यांच्याकडे दिली होती. ती फाईल देण्याअगोदरच मी तुमची फाईल रद्द करेन, या संदर्भात माझेकडे भरपुर कारणे आहेत असे म्हटले, त्यानंतर मी बँकेच्या जिल्हा कार्यालयात कुमार गौरव यांना फोनवरुन माझी तक्रार दिली. परंतु पळशी शाखाधिकारी यांनी फाईल रद्द करण्यासाठी मोठे कारण नसताना चुकीचे कारण देत, तुम्ही मुंबईला शिक्षक असताना तुमच्यावर शिक्षकांनी गैरवर्तन केल्याचा आरोप करुन तेथील मुख्याध्यापकांनी तुम्हाला कामावरुन काढुन टाकले. असे खोटे कारण दिल्यामुळे माझी व माझ्या कुटुंबियांची मानसिकता बिघडून माझी गावात व परिसरात बदनामी केली. त्यामुळे गावातील लोक माझ्याकडे संशयाने पाहत आहेत. त्यामुळे माझी वनकुटा परिसरात नाचक्की झाली आहे. मला व माझ्या कुटुंबाला समाजात वावरणे मुश्किल झाले आहे. वास्तविक लोन नाकारताना जी कारणे दिली, त्यात धंद्यासंदर्भात काही कारण न देता ते वस्तुस्थितिला धरुन नाही. माझ्या वैयक्तिक जीवनात डोकवण्याचा अधिकार थोरात यांना कुणी दिला? असे लेखी तक्रार अर्जात संतोष केदारी यांनी म्हटले आहे.

संतोष केदारी आम्हाला चुकीचे बॅलेन्सशीट दिले, त्यानंतर यांच्या दुकानाची पाहणी केली असता, त्यांच्या व्यवसायाप्रमाणे त्यांना 50 हजार रुपये कर्ज देण्यास बँक तयार होती. मात्र कर्ज मागणी जास्त असल्याने त्यांची चौकशी केली असता आम्हाला जी कारणे दिसली ती दिली आहेत, व त्यांचे कर्ज नाकारण्यात आले. 
- दत्ता थोरात, शाखाधिकारी, सेंट्रल बँक, पळशी शाखा