Breaking News

बँक कर्मचारी भरतीत नवीन चाल; अल्पवयीन आप्तांना वेतनाची खिरापत नाशिकच्या शाखा व्यवस्थापकाची तडकाफडकी बदली


अहमदनगर/विशेष प्रतिनिधी । 09 :
नगर अर्बन बँकेचा कारभार एकहाती रहावा, सत्तेचे केंद्रीकरण व्हावे, या हेतूने बँकेभोवती फास आवळण्याचा एक भाग म्हणून कर्मचारी भरतीत पक्षपाती निर्णय घेतल्याचा आरोप होत आहे, विशेष म्हणजे भरतीचे नियम पायदळी तुडवितांना अल्पवयीन आप्तांना बँक सेवेत रूजू करून घेत हजारो रूपयांच्या वेतनाची खिरापत मानस स्वकीयांवर उधळण्याची नवीन चाल बँकेच्या उच्चपदस्थांनी खेळल्याची कुणकुण आहे. दरम्यान, लोकमंथनने या गांधीगिरीचे गौडबंगाल प्रसिध्द करण्यास सुरूवात केल्यानंतर व्यापारी वर्गात निर्माण झालेली अस्वस्थता चेअरमनला सांगणार्‍या नाशिक शाखा व्यवस्थापकावर संताप व्यक्त करून त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याचे वृत्त आहे.
चार भिंतींच्या आत शिजलेली खलबते दाराबाहेर जाऊ नयेत म्हणून बँकेचे कर्मचारीही आपल्या विश्‍वासातील असावेत, या उद्देशाने नगर अर्बन मल्टीस्टेट को ऑप बँकेच्या चेअरमन, व्हा. चेअरमन आणि संचालक मंडळाने आपल्या विश्‍वासातील, मर्जीतील आप्तांना बँकेत नोकरी लावण्याचा निर्णय घेतला. या भरती प्रक्रीयेत सर्वसाधारण नियमांची पार मोडतोड केली, या संधीचा फायदा घेऊन बँकेच्या प्रशासनात उच्चस्थानी असलेल्या एका मुख्याधिकार्‍याने नवीन चाल खेळत आपल्या स्नेही जनाच्या अल्पवयीन मुलांना बँकेच्या सेवेत सामावून घेण्याचे औदार्य दाखविले. वयाची अठरा वर्ष पुर्ण होण्याआधीच ही मुले पाच आकडी पगार घेण्यास पात्र ठरविण्याचा नवीन पायंडा पाडला. आधी बहीण आणि नंतर भाऊ बँकेच्या सेवेत रूजू झाला. वर्षानुवर्ष बँकेच्या सेवेत असलेल्या कर्मचार्‍यांपेक्षा अधिक वेतन घेणार्‍या या अल्पवयीन सेवकांचा या बँक कर्मचार्‍यांना हेवा आणि धाक वाटतो.
दरम्यान, लोकमंथनने गेल्या दहा-बारा दिवसापासून अर्बन बँकेतील गांधीगिरीचे गौडबंगाल चव्हाट्यावर आणण्यास सुरूवात केल्याने सभासद ठेवीदारांमध्ये अस्वस्थता निर्माण होणे स्वाभाविक होते. नाशिकच्या रविवार पेठ परिसरातील व्यापारी सभासदांमध्ये अशीच अस्वस्थता निर्माण झाल्याची माहीती देणे आपले कर्तव्य आहे, या भावनेतून नाशिक शाखेच्या व्यवस्थापकांनी चेअरमनला परिस्थितीची कल्पना दिली. सत्य आणखी बोचल्याच्या वेदनेने संतप्त झालेल्या चेअरमनने शाखा व्यवस्थापकाला लाखोली वाहून त्यांची नाशिकहून उचलबांगडी करीत बेलापूर दाखवले. यावरून अर्बन बँकेचा कारभार कुठल्या दिशेने सुरू आहे, याची जाणीव सभासदांना होऊ लागली आहे.
उद्याच्या अंकात
विद्यमान संचालकांकडून न्यायालयाचा अवमान अर्बन बँकेला मल्टीस्टेट बनविण्याची धडपड कशासाठी? शताब्दी वर्षानिमित्त सभासदांची भेट प्रलंबित का आहे? संचालकांचा भत्ता वाढवून प्रतिसंचालक प्रतिवर्ष 80 हजाराचा भुर्दंड का? मुंबईत अद्याप शाखा का उघडली नाही? मल्टीस्टेट म्हणविता तर महाराष्ट्राबाहेर शाखा का नाहीत? सुरत, बडोदा येथे खोटे पत्ते देऊन सभासद नोंदणी करण्याचा हेतू काय? खासदार पदाचा दुरूपयोग करून सहकार खात्यावर दबाव आणून घोटाळ्यांची चौकशी का दाबता? यासारख्या अनेक प्रश्‍नांची उत्तरे शोधणारी मालिका... अर्बन बँकेतील गांधीगिरीचे गौडबंगाल!
लोकमंथन लढणार कायद्याची लढाई
दै. लोकमंथनने अर्बन बँकेतील गांधीगिरीचे गौडबंगाल ही मालिका सुरू केल्यानंतर बँकेच्या मनमानी कारभाराविरूध्द एकाकी लढा देणार्‍या जाणकार मंडळींमध्ये लढा आणखी तीव्र करण्यास नवचैतन्य संचारले. विद्यमान कारभाराबाबत अनभिज्ञ असलेल्या सभासदांमध्ये जागृती झाली.तेही या लढ्यात सहभाग नोंदविण्याची इच्छा प्रदर्शित करू लागले, तर विद्यमान कारभार्‍यांच्या तळ पायाची आग मस्तकात जाऊ लागली आणि मग साम दाम दंड भेद या उपाय योजना अंमलात आणणे सुरू झाले. मात्र लोकमंथन अशा षंढ उपाययोजना भिक घालीत नाही. वास्तव मांडण्यास कधी कचरत नाही. कायद्याचा मान राखतो म्हणून अशा मंडळींसोबत लढण्यासाठी दै. लोकमंथनने कायदेशीर लढाईचीही तयारी सुरू केली आहे.