Breaking News

प्लॅस्टिक बंदीला शेवगाव शहरांमध्ये तिलांजली


रवी उगलमुगले , शेवगाव 
महाराष्ट्र शासनाने प्लास्टिक बंदीचा अतिशय धाडसी निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणीही तितक्याच प्रभावीपणे राबविल्यामुळे भविष्यातील येणार्‍या प्लॅस्टिकच्या महापुराचा धोका वाचणार आहे असे अनेक जाणकारांच्या मते, ऐकावयाच मिळत आहे. परंतु काही व्यापारी संघटनांनी याला मुदतवाढ मिळावी किंवा हा निर्णय रद्दबादल ठरावा अशा प्रकारच्या कार्याला सुरुवात केली आहे. परंतु पर्यावरण संतुलन व त्यापासून होणारी हानी लक्षात घेता हा निर्णय शासन बदलणार नसल्याचे वारंवार स्पष्ट केले आहे. या निर्णयाचे अनेक सामाजिक व स्वयंसेवी संघटनाकडून स्वागत होत आहे. परंतु शेवगाव शहरात प्लास्टिकचा वापर सर्रासपणे होताना दिसत आहे. त्यामुळे शेवगाव शहरामध्ये प्लॅस्टिक बंदीला तिलांजली मिळते की काय ? असा प्रश्‍न अनेकांच्या मनात आहे.
शेवगाव ही जिल्ह्यातील मोठी आर्थिक बाजारपेठ असल्याने या ठिकाणावरून खरेदी-विक्रीचे व्यवहारापासून तर थेट शालेय विद्यार्थ्यापर्यंत औद्योगिक प्रशिक्षण केंद्र व कापसाची मोठी बाजारपेठ आहे. अनेक भौतिक सुखसोयींनी युक्त असे मंगल कार्यालये असल्याने तालुक्यातील पूर्व भागातील पाणी टंचाई चा प्रश्‍न असणार्‍या अनेक गावातील लोक आपल्या मुला मुलींची लग्न शेवगाव शहरांमधील मंगल कार्यालयात करण्यास पसंती देतात. त्यामध्ये भेटवस्तू देणारे घेणार्‍यांची संख्या तितकीच मोठी असते , त्यातही सरस प्लॅस्टिकचा वापर होत असताना दिसत आहे. माणसांची इथे मोठी वर्दळ शेवगाव शहरात कायम असते, त्यामुळे की काय प्लास्टिक बंदीला शेवगाव शहरांमध्ये अपयश आले असे वाटते ! शेवगाव नगरपरिषदेमार्फत प्लास्टिक मुळे तुंबलेल्या गटारांचा प्रश्‍न काही दिवसांपूर्वी सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांनी धसास लावून तो मार्गी लावला होता. परंतु प्लास्टिक बंदीला नेमका शेवगाव शहरामध्ये अडथळा निर्माण झाल्याने त्याला नेमका जबाबदार कोण याकडे सध्या जाणकार कुतूहलाने पहात आहेत. शेवगाव शहरामध्ये नगरपरिषद होऊनही मोकाट जनावरांची व मोकाट कुत्र्यांची संख्या मोठी आहे. त्यांचा बंदोबस्त करण्याकडे नगरपरिषदेने कुठलेही पाऊल उचललेले नाही. त्यामुळे मोकाट जनावरेही प्लास्टिकचे बळी ठरतात की काय असाही सूर सध्या शहरांमध्ये निघत आहे. तर शालेय विद्यार्थ्यांनी या निर्णयाचे स्वागत करून प्लास्टिक बंदीला पाठिंबा दर्शविला आहे . परंतु सर्वसामान्यांसह सुशिक्षित नागरिक मात्र या निर्णयाचे आपण काहीच देणेघेणे नसल्यासारखे हातात प्लॅस्टिक पिशव्या घेऊन शहरात, तहसील कार्यालयात , मुद्रांक विक्री केंद्रात, आंबेडकर चौक परिसर, शिवाजी चौक परिसर, गोपीनाथ मुंढे चौक, मंगल कार्यालय परिसर, परराज्यातील मिठाई विक्रीच्या दुकानात मोठ्या प्रमाणात प्लास्टीक पिशव्यांचा वापर सर्रास चालू आहे. प्लास्टिकच्या पिशव्यांची देवाण-घेवाण चालू आहे . याकडे मात्र अधिकार्‍यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.


चौकट - राज्यामध्ये शासनाने घातलेला प्लास्टिक बंदीचा निर्णय लेखी अथवा तोंडी स्वरूपात आम्हाला न मिळाल्यामुळे शेवगाव शहरात प्लॅस्टिकच्या होणार्‍या मोठ्या वापरास बंधन घालण्यास अडचणी येत आहेत. भारत चव्हाण, आरोग्य विभाग प्रमुख , नगर परिषद शेवगाव