Breaking News

विठूभक्तांच्या सेवेतच ‘त्यांना’ दिसली मानवी जीवनाची धन्यता!


राहुरी तालुका प्रतिनिधी


आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांची अनेकजण आपापल्या पध्दतीने सेवा करत असतात. भक्ताची सेवा ही विठूरायाची सेवा असे समजून ही सेवा केली जाते. या अनुषंगाने वांबोरी येथील सामाजिक कार्यकर्ते अरुण दुधाडे हे अनेक वर्षांपासून वारीला जाणार्‍या वारकर्यांची मोफत दाढी व केस कापून सेवा करत आहेत.

दरवर्षी वांबोरीमार्गे अनेक दिंड्या पंढरपूरकडे जातात. त्रिंबकेश्वर नाशिक येथून निघणारी दिंडी मजल दर मजल करीत वांबोरीत येते. गावातील चौकाचौकांत दिंडीचे स्वागत केले जाते. अनेक ठिकाणी अल्पोपहाराची सुविधा उपलब्ध करुन दिली जाते. वांबोरीतील सामाजिक कार्यकर्ते अरुण दुधाडे यांचे वांबोरीत केशकर्तनालय आहे. गेल्या चार वर्षांपासून ते दिंडीत पायी चालून थकलेल्या वारकऱ्यांना मोफत सेवा उपलब्ध करुन देतात. यंदाही त्यांनी ही परंपरा अखंडीतपणे सुरु ठेउन आलेल्या दिंडीतील वारकऱ्यांना दुकान बंद ठेऊन मोठ्या श्रद्धेने सेवा केली. त्यांच्या कार्यात वांबोरीतील श्रीसंत सावता माळी युवक संघाचे तालुका अध्यक्ष अशोक तुपे, वडार समाज संघटना जिल्हा अध्यक्ष दिनेश कुसमुडे, शाम शर्मा, निखिल शिंदे, संजय सोणावने, सत्कार दुधाडे आदी तरुण मंडळी सहभागी होत आहेत. यासंदर्भात दुधाडे म्हणाले, वर्षभरातील ३६५ दिवस आपण प्रपंचासाठी कष्ट घेत असतो. परंतु, एक दिवस मी वारकऱ्यांच्या सेवेसाठी देतो. परिस्थितीमुळे वारकऱ्यांना देण्यासाठी आपल्याकडे दुसरे काहीही नाही. वारकऱ्यांची सेवा करण्यात विशेष आनंद होत आहे.


हरिभक्तांचे अखंड सेवाव्रत 

वारकरी संप्रदायाला शेकडो वर्षांची मोठी परंपरा आहे. या दिंडी हा विषय प्रामुख्याने असून दरवर्षी पंढरीच्या वारीला जात असलेल्या वारकऱ्यांमार्फत पंढरीच्या विठूरायाला साकडे घालण्याचे प्रथा आहे. यातूनच वारकऱ्यांची सेवा करण्याच्या अखंड व्रताला प्रारंभ झाला. महाराष्ट्र्रात आज अनेकजण हे व्रत प्रामाणिकपणे पाळत आहेत.