पोषण अभियान प्रभावीपणे राबवा : पंकजा मुंडे
नागपूर : कुपोषणाचा समूळ नायनाट करण्यासाठी व भावी पिढी सशक्त बनविण्याकरीता राज्यात पोषण अभियान कार्यक्रमाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात यावी, असे आवाहन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. महिला व बाल विकास विभाग, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई तर्फे सिव्हील लाईन्स परिसरातील हिस्लॉप कॉलेज जवळील चिटणवीस सेंटर येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पोषण अभियान कार्यक्रमाचा शुभारंभ पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. पोषण अभियान हे केंद्र सरकारचे महत्त्वाकांक्षी अभियान असल्याचे सांगून पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, देशातील बालमृत्यू व कुपोषण थांबविण्यासाठी शासनाने हे महत्वपुर्ण पाऊल उचललेले आहे. देशाची पिढी सशक्त बनविण्यासाठी यामध्ये सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. सन 2022 पर्यंत जगात सर्वाधिक तरूणांची संख्या भारतात असणार आहे. त्यामुळे या पिढीला सशक्त बनविण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. त्याकरीता माता व बालकांना सशक्त बनविण्यासाठी पोषण अभियान राज्यात यशस्वीपणे राबविण्यात यावे. शंभर टक्के हे अभियान राबविणारे महाराष्ट्र हे देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
Post Comment