गोकुळमधील नोकर भरती प्रक्रियेला स्थगिती
नागपूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातील (गोकुळ) नोकर भरतीबाबत आरक्षणाची नियमावली पाळली नसेल तर चौकशी पूर्ण होईपर्यंत भरती प्रक्रियेस स्थगिती राहिल, अशी माहिती दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी विधानपरिषदेत दिली. गोकुळ नोकर भरतीत भ्रष्टाचार झाल्याची लक्षवेधी सूचना सदस्य सतेज उर्फ बंटी पाटील यांनी मांडली होती. लक्षवेधीला उत्तर देताना जानकर बोलत होते. ते म्हणाले, गोकुळ दूधसंघाचे कार्यक्षेत्र संपूर्ण जिल्हा आहे. या दूधसंघात 429 पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरु आहे. नोकर भरतीच्या प्रस्तावास मान्यता देण्याचे अधिकार संबंधित उपनिबंधक यांना आहेत. 2004 च्या सहकारी कायद्यानुसार या भरतीमध्ये मागासवर्गीयांना आरक्षण ठेवले नाही. यासाठी दुग्धविकास संस्थामध्ये मागासवर्गीयांच्या आरक्षणासाठी कायद्यात बदल करावा लागेल. भरती प्रक्रियेबाबत सहकार आयुक्तांच्या माध्यमातून चौकशी सुरु आहे. भ्रष्टाचार झाला असल्याचे आढळून आल्यास पुन्हा चौकशी करुन कारवाई करण्यात येईल. भरती प्रक्रियेसाठी आकृतीबंध महत्वाचा असल्याने तो तपासण्यासाठी चौकशी करण्यात येईल, असेही जानकर यांनी सांगितले.
Post Comment