Breaking News

दोन दुकांनामधून चोरीच्या मोबाईलची विक्री; एका मोबाईल विकेत्यानेच दिली माहिती


अकोले / प्रतिनिधी 
अकोले शहरातील दोन दुकानांमधून चोरीच्या महागड्या मोबाईलांची विक्री होत असल्याची माहिती एका मोबाईल विक्रेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.त्यामुळे पोलीस प्रशासनाने या दोन मोबाईल दुकानदारांवर कारवाई करून मुद्देमाल ताब्यात घेण्याची गरज आहे.
दैनिक लोकमंथनने अकोले शहरात चोरीच्या महागड्या मोबाईलची विक्री होत असल्याची, बातमी प्रसिद्ध केली होती. त्यामुळे अकोले शहरातील अनेक मोबाईल विक्रेत्यांचे धाबे दणाणले. अनेक नामांकित कंपन्यांचे महागडे मोबाईल कवडीमोल किंमतीत विकण्याचा धंदा अकोले शहरात तेजीत सुरू आहे. नाशिक, पुणे, मुंबई या ठिकाणाहून येणारे चोरीचे मोबाईल अकोले शहरातील काही मोबाईल विक्रेते खरेदी करीत आहेत. मोबाईल विक्रेते चोरीच्या मोबाईलच्या आयएमईआय नंबरशी छेडछाड करून हे मोबाईल विक्रीसाठी बाजारात दाखल करीत आहे. अ‍ॅपल, सॅमसंग, सोनी, विवो, एमआय या कंपन्यांचे महागडे मोबाईल अवघ्या पाच ते दहा हजारात विकले जात आहे. काही चाणाक्ष नागरिक हे मोबाईल खरेदीवेळी बिलाची मागणी करतात.अशावेळी हे मोबाईल विक्रेते आपल्या दुकानाचे बनावट बिल नागरिकांना देवून त्यांची दिशाभूल करत आहेत. अशा चोरीच्या मोबाईल विक्री करणार्‍यांचे एक रॅकेट शहरात आहे. चोरीच्या मोबाईलमध्ये महाविद्यालयीन तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे. खुद्द एका मोबाईल विक्रेत्यानेच भेटून अकोले शहरातील दोन दुकानात चोरीच्या मोबाईलची विक्री सुरू असल्याचे सांगितल्याने, अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या चोरीच्या मोबाईल विक्रीत महविद्याद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग दिसून येतो. आता महाविद्यालय सुरू झाल्यामुळे, अशा चोरीच्या मोबाईलची विक्री तरूणांमध्येच सुरू आहे. मुलांच्या पालकांनी या घटनेकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. अकोलेच्या आठवडे बाजारातदेखील या टोळीचे काही पंटर घिरट्या घालताना दिसून येतात.त्यामुळे या बाजारातुन अनेकांचे मोबाईल चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. या टोळीचा अकोलेतील काही दुकानदारांशी थेट संबध येत असल्याने पोलीस प्रशासनाला कारवाई करताना अडचणी येत आहेत. पोलीस प्रशासनाने या टोळीचा छडा लावल्यास, अनेक मोबाईल चोरीचे गुन्हे उजेडात येतील. दैनिक लोकमंथनला मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार अकोले शहरात एकूण चार दुकानांतून चोरीच्या मोबाईलची विक्री सुरू आहे. ग्राहकांनी जूना मोबाईल खरेदी करताना काळजी घेणे गरजेचे आहे, अन्यथा चोर सोडून संन्याशालाच फाशी व्हायची.