Breaking News

एसटी कर्मचाऱ्यांना ४ हजार ८४९ कोटी रुपयांची भरघोस वेतनवाढ


मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांसाठी परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी आज भरघोस वेतनवाढ जाहीर केली. ही वेतनवाढ ४ हजार ८४९ कोटी रुपयांची असून यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात साधारण ३२ ते ४८ टक्के इतकी वाढ होणार आहे. राज्यातील १ लाख ५ हजार ६७९ एसटी कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे, अशी माहिती मंत्री श्री. दिवाकर रावते यांनी आज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

श्री. रावते यांनी यावेळी कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या समानीकरणाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. याशिवाय एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी सावित्रीबाई जोतिबा फुले शिष्यवृत्ती योजना तसेच कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण अग्रीम योजनाही यावेळी जाहीर करण्यात आली. श्री. रावते यांनी ही वेतनवाढ जाहीर करण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ही वेतनवाढ त्यांच्या निदर्शनास आणून आपण ती जाहीर करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

सह्याद्री राज्य अतिथीगृहात झालेल्या या पत्रकार परिषदेस खासदार अरविंद सावंत, आमदार भाई जगताप, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंह देओल उपस्थित होते.