Breaking News

वाळू उपसा विरोधात सरपंचांचे तहसील कार्यालयासमोर उपोषण


श्रीगोंदा / प्रतिनिधी 
तालुक्यात बेकायदा वाळूचा होणारा उपसा यामुळे परिसरात होणारी हानी याकडे महसूल प्रशासन डोळे झाक करत आहे. असा आरोप करीत पेडगाव येथील भीमा नदीतून होणारा बेकायदा वाळूचा उपसा तातडीने बंद करावा या मागणीसाठी पेडगाव येथील सरपंच सुलोचना भगवान कणसे यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषणाचा प्रारंभ केल्याने अनेकांनी या उपोषणाला पाठिंबा दिला आहे.
उपोषणादरम्यान दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पेडगाव येथील भीमा नदी पात्रातून बेकायदा वाळूचा उपसा होत आहे. या प्ररकारामुळे परिसरातील रस्ते यांची पुरती वाट लागली, त्यामुळे रस्त्याने प्रवास करणे अगदी जिकरीचे होवून बसले आहे. वाहणाच्या अवजड वजनामुळे अनेकांच्या पाईपलाईन दबून गेल्याने शेतीला तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.
बेकायदा वाळूचा उपसा होऊ न देने हे खरे, महसूल प्रशासनाचे काम आहे. मात्र याकडे होणारा काना डोळा वेगळेच काही सांगून जातो. कोणाला लाभ होतो या पेक्षा यामुळे त्रास किती लोकांना होतो, याकडे खरे तर पाहिले पाहिजे, मात्र तसे घडत नाही. म्हणून महिला असूनही बेकायदा वाळूचा उपसा रोखण्यासाठी महिलांना आता उपोषणाचे हत्यार उपसावे लागले. हे महसूल प्रशासनासाठी घोक्याची घंटा समजावी. तालुक्यात होणारा वाळूचा उपसा महसूल प्रशासनाच्या अर्थपूर्ण संबंधाने होत असल्याचा आरोप नदीकाठच्या ग्रामस्थांचा आहे. 

गेल्या काही दिवसांपूर्वी घोड नदीपात्रातून होणारा बेकायदा वाळू उपसा याचा व्हिडीओ तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांना देवूनही कारवाई होत नसेल तर, नेमके काय समजावे याची चौकशी होणे गरजेचे आहे.