Breaking News

अकोले बसस्थानक बनले मटका जुगाराचे आगार ! पोलीसदादांनी कारवाई करण्याची गरज

नागरिकांचा प्रवास सुलभ होण्यासाठी, प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाण्यासाठी शासनाने ठिकठिकाणी बसस्थानकांची निर्मिती केली आहे.परंतु अकोले बसस्थानकात प्रवाशांची लुडबुड कमी आणि मटका जुगार खेळणार्‍या नागरिकांचीच संख्या जास्त दिसून येत आहे. मटका, जुगार खेळणारे लोकं ही घोळके करून बसतात. ते स्वतः ही खेळतात व दुसर्‍यांनाही खेळण्यास भाग पाडतात. बसस्थानकात सुरू असलेल्या या मटका, जुगारामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी वाममार्गाला जात असल्याचे भिषण वास्तव चित्र अकोले बसस्थानक परिसरात दिसून येत आहे.

येथील बसस्थानक परिसरात मटका जुगार पोलिसांच्या नाकावर टिच्चून जोरदार सुरू आहे. बसस्थानकाच्या एका बाजूला झाडांची हिरवीगर्द सावली असल्याने या सावलीत आरामात बसून मटका व जुगार बहाद्दर आपला धंदा तेजीत चालवितात. मटका व जुगाराच्या आहारी केवळ वृद्ध व्यक्तीच गेली नसून, महाविद्यालयीन मुले व तरुणवर्ग देखील पुरता गेला आहे. पोलीस या परिसरात कधी नव्हे येतात. एखाद्या मटका बुकीवर कारवाई करून, आपण खूप मोठी कामगिरी केली असल्याचे भासवून निघून जातात. या परिसरात मटका बुकिंवर कारवाई होण्याच्या अगोदरच या बुकींना सूत्रांकडून माहिती समजलेली असते. त्यामुळे पोलीस व मटकाबुकी यांची नजरानजर होवून एकदाही पोलिसांनी कारवाई केली नसल्याचे निदर्शनास येते. अकोले शहरात सुरू असलेला मटका, जुगार व अवैध धंदे बंद करण्याचे मोठे आव्हान अकोले पोलिसांसमोर उभे आहे. येथील पोलीस ठाण्यात अनेक अधिकारी येवून गेले, मात्र एकही असा खमक्या अधिकारी आला नाही की, ज्याने अवैध धंद्यांच्या मुळाशी जावून कारवाई केली. दुपारच्या सुमारास बसस्थानक परिसरात फेरफटका मारल्यास बसस्थानकात प्रवाशी कमी व मटका जुगार्‍यांंची संख्याच अधिक दिसून येते. पोलीस प्रशासनाने या अवैध धंदेवाल्यांच्या विरोधात कडक कारवाई सुरू केल्यास, मटका व जुगाराचे जाळे लवकरच उघड होईल, मात्र यासाठी गरज आहे पोलिसांच्या सकारात्मक कारवाईची! अकोले शहरात कार्यरत असलेल्या पोलिसांना सध्या अच्छे दिन आले असून, दर महिन्याला या अवैध धंदे धारकांकडून लाखो रुपयांची रसद संबंधित पोलिसांच्या खिशात दान म्हणून पडत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील या अनोख्या दानाला भावले असून ’तेरी भी चूप और मेरी भी चूप, असे म्हणत सगळे मोजून मापून खात आहेत.


कोट - 
नूतन पोलिस निरिक्षक, अकोले पोलीस ठाण्यात दाखल झाल्यापासून, त्यांनी अवैधधंदे धारकांवर एकदाही कडक कारवाई केल्याचे दिसून आले नाही. याउलट एम.बी. पाटील, अविनाश शिळीमकर, उत्तम शेळके दिवंगत पोलीस निरीक्षक अशोक खंदारे यांनी केलेल्या कडक व तीव्र कारवाया अकोलेकर अजूनही विसरलेले नाहीत. झोपेचं सोंग घेवून बसलेल्या अकोले पोलिसांनी अवैध धंदे बंद करून भावी तरुण पिढीला अवैध धंद्यांच्या विळख्यातून बाहेर काढण्याची गरज आहे.