राज्यातील दूध दर वाढीसंदर्भात राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अंतर्गत दूध व्यावसायिकांच्या समितीची स्थापना करण्यात आली. या समितीमध्ये राज्यातील दहा दूध व्यावसायिकांच्या प्रतिनिधीची नेमणूक करण्यात आली आहे. आज पुण्यात राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली समितीची पहिली बैठक झाली. या बैठकीत दूध व्यवसाय, दूध दर यासंदर्भात चर्चा करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून दूध व्यवसाय संदर्भातल्या अडचणी आणि त्यावर काय तोडगा काढावा याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांना कळवली जाणार आहे, असे आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सांगितले. गुजरातच्या धर्तीवर दूध भुकटीवर प्रति किलो 50 रुपये अनुदान देण्यात यावे, तूप आणि बटरवर असलेला 12 टक्के जीएसटी 5 टक्के करण्यात यावा, शालेय पोषण आहारात दूध देण्यात यावे, शा सूचना करण्यात आल्या. दरम्यान दूध दराच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आंदोलन करू नये. या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी सरकारला त्यांनी वेळ द्यावा, असे आवाहन पाशा पटेल यांनी यावेळी केले.