Breaking News

ऐतिहासिक सातारा जिल्ह्यात उमेदवार देणार - हेमंत पाटील

घराणेशाही विरोधात लोकांच्या भावना तीव्र असताना युवावर्गाला बेरोजगारीच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी कृतीशील नेतृत्व युवावर्गातून देण्याचा संकल्प आहे. त्यानुसार पक्ष सर्वसमावेशक भूमिका घेत असून जिल्ह्याच्या विकासासाठी स्थानिक नेतृत्वाने सक्रीय योगदान देण्याची तयारी दर्शवल्यामुळे येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक सातारा जिल्ह्यात सर्वसामान्य नागरिकांच्या आग्रहामुळे उमेदवार उभे करुन निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती बहुजन हृदयसम्राट व भारत अगेंसट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील पत्रकाद्वारे दिली. निवडणूक आयोगाने निवडून येण्यासाठी अनेक चांगले महत्वाचे निर्णय घेतले असून अजूनही गरीब उमेदवारांच्या हितासाठी निर्णय घेणे येत्या काही दिवसात अपेक्षित आहेत. यामुळे सर्व सामान्य माणूस आमदार, खासदार आणि मंत्री होऊ शकतो. निवडणूक आयोगाने ठरवुन दिलेल्या खर्चात निवडणूक लढता येणार असल्याने सत्तेची मस्ती आलेल्या आणि ‘सत्तेतून पैशा आणि पैशातून सत्ता’ मिळवलेल्यांना चाप बसेल, असे पाटील म्हणाले. महाराष्ट्रात घराणेशाहीचा पायंडा अजुन सुद्धा चालु आहे. सत्ताधाऱ्यांचीच वंशावळ पुढे राजकारण करत आहे आणि यांच्याच मागे पुढे-किती दिवस करायचे, हे गरीब-होतकरू लोकांच्या माथ्याला मारले गेले आहे. सर्वसामान्य नागरिक ज्याला लोकांची सेवा करायची इच्छा असेल, त्यांनी समाजकारण राजकारण करायचे कि नाही ? हे येथील जाणकारांनी ठरवणे गरजेचे आहे. मराठा, धनगर, ओबीसी, मुस्लिम, माळी, वंजारी आणि अनेक जातींच्या विकासासाठी व युवा वर्गाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ठोस भूमिका घेण्याची वेळ आलेली आहे. युवावर्ग राजकारणात सक्रिय झाल्यास या देशातील नागरिकांचा खरा विकास होईल. राजकारणात प्रत्येक वेळी तोच चेहरा बघतो आणि तोच चेहरा निवडून येतो तरी सुद्धा काय आपली प्रगती झाली, हे जनतेने मागे वळून पाहिले पाहिजे. आपण घराणेशाहीत सत्तेचा लाभ घेणाऱ्यांच्या ताटाखालील मांजर होऊन किती दिवस जगायचे? असा प्रश्न असल्याने ऐतिहासिक वारसा असलेल्या साताऱ्यात उमेदवार देणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.