Breaking News

दगडफेक रोखण्यासाठी जवानांनी काश्मिरी तरुणाला जीपवर बांधलं!

श्रीनगर, दि. 15 -  जम्मू-काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर दगडफेक होऊ नये, यासाठी जवानांनी नामी उपाय शोधला आहे. जवानांच्या गाड्यांना 400 काश्मिरी तरूणांनी घेरलं होतं. या परिस्थितीत दगडफेक होऊ नये, यासाठी जवानांनी एका काश्मिरी तरुणालाच जीपवर बांधून नेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
9 एप्रिलची ही घटना असून जमावातून बाहेर पडण्यासाठी जवानांना नाईलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागला, असे समजते. तर दुसरीकडे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी या घटनेची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. सीआरपीएफच्या जवानांनी काश्मिरी तरुणाला गाडीसमोर बांधल्यानं उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या.
9 एप्रिलला श्रीनगरमध्ये पोटनिवडणुकीची ड्युटी संपवून सीआरपीएफचे जवान निघाले होते. त्यावेळी काश्मिरच्या फुटीरतावाद्यांनी जे कृत्य केलं, त्याने देशवासियांची तळपायाची आग मस्तकात गेली. पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तावरुन परतणार्‍या सीआरपीएफ जवानांना काही टवाळखोर फुटीरतावाद्यांनी चक्क लाथा-बुक्यांनी मारलं. याबाबतचा व्हिडीओ समोर आला आहे. विशेष म्हणजे हे फुटीरतावादी तरुण मारत असताना, हातात एके-47 असलेले देशाचे रक्षणकर्ते शांत होते. ते कुठल्याही प्रकारचं प्रत्युत्तर देत नाहीत. कारण दुश्मानाच्या नरडीचा घोट घेणार्‍या जवानांना देशातील नागरिकांना हात न लावण्याची शिकवण दिली जाते. फुटीरतवाद्यांसाठी हेच खरं चोख प्रत्युत्तर आहे.