Breaking News

भोजापूर, निळवंडे’चा प्रश्न नागपूर अधिवेशनात मांडू : विखे

तळेगाव दिघे प्रतिनिधी

संगमनेर तालुक्यातील तळेगाव आणि निमोण या दुष्काळी पट्ट्यातील निळवंडे कालवा व भोजापूर चारीचा प्रश्न नागपूर अधिवेशनात मांडून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, अशी ग्वाही विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी दिली. 

येथील घोडमाळ वस्तीवर कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांशी संवाद साधतांना ते बोलत होते. ते म्हणाले, संगमनेर शहरासाठी आलेल्या जलवाहिनीतून तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेला पाणी मिळविण्यासाठी ग्रामपंचायतीने ठराव करावेत. नागपूर अधिवेशनात लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसोबत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. निळवंडे धरणाच्या कालव्यासाठी मागील चार वर्षांपासून पाठपुरावा सुरु आहे. ‘निळवंडे’चे पाणी कोपरगावला देण्यास लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचा विरोध आहे. मात्र यावर संबंधितांना विश्वासात घेऊन मार्ग काढला जाईल. 

याप्रसंगी तळेगाव ग्रामस्थांनी पाणीपुरवठा योजना, आणेवारी, पीक विमा, गावठाण हद्द, मास जळीत प्रकरण, यासह विविध समस्या मांडल्या. शरद थोरात, नामदेव दिघे, किसन दिघे, ज्ञानदेव दिघे, अशोक इल्ले, गोविंद कांदळकर, डॉ. आर. पी. दिघे आदी याप्रसंगी उपस्थित होते. प्रारंभी प्रकाश दिघे यांनी प्रास्ताविक केले. सुनील दिघे यांनी आभार मानले.