Breaking News

सफाई कामगार त्रिशला शिंदे यांचा प्रामाणिकपणा; लाखभर रूपयांचे दागिणे मूळ मालकास सुपूर्त


श्रीगोंदा / प्रतिनिधी 
अहमदनगर येथील क्रिस्टल कपंनीच्या सफाई कामात माळीवाडा येथे उदरनिर्वाहासाठी काम करीत असलेल्या, त्रिशिला नितीन शिंदे या महिलेस कामादरम्यान सुमारे लाखभर रुपयांच्या आसपास सोन्याचे दागिने सापडले. मात्र तिने कोणतेही लालच मनात न बाळगता, सदरील सर्व दागिने मूळ मालकाला परत सुपूर्त केल्याने शिंदे यांच्या प्रामाणिकपणाची सर्वत्र चर्चा होत असून, सर्व अधिकारी व कंपनीचे कर्मचारी त्रिशला शिंदेचे अभिनंदन करीत आहेत.
दि.2 जुलै रोजी शिंदे या आपल्या दैनंदिन कामात माळीवाडा येथे काम करत असताना, एक अनोळखी पिशवी कचर्‍याच्या कुंडीत आढळून आली. त्या पिशवीत पाहिले असता, एक महिलेच्या गळ्यातील गंठण, एक गळ्यातील ठुशी, एक अंगठी, लहान मुलांच्या गळ्यातील बदाम व चांदीची कंबर साखळी, चांदीच्या पट्टया व एक मोबाईल आदी सोन्या चांदीच्या वस्तू ज्यांची बाजरभाव किंमत अंदाजे एक ते एक लाख दहा हजार रुपये असावी. आदी वस्तू सापडल्या, मात्र क्षणाचाही विचार व लालूच मनात उत्पन्न होवू न देता, त्रिशला शिंदे यांनी सदरील प्रकार कामातील वरिष्ट अधिकार्‍यांना कळविला. तसेच त्यांनी ही एस.टी. आगराच्या मुख्य अधिकार्‍यांना सदरील बाब कळविली. त्यानुसार वस्तू हरवलेल्या व्यक्तिने चौकशी करीत एस.टी. अधिकार्‍यांशी संपर्क साधला व सर्व वस्तू अधिकार्‍यांच्या ताब्यात देण्यात आल्या. त्यानुसार तारकपूरचे आगार व्यवस्थापक कलापुरे, स्थानक प्रमुख रोहित रोकडे, क्रिस्टलचे जिल्हाप्रमुख निलेश आडोळे, तसेच कानिफनाथ दारकुंडे व स्वतः वस्तू हरवलेले कुटुंब तसेच त्रिशला शिंदे व आगारातील कर्माचारी यांच्या उपस्थितीत ते दागिने मूळ मालकास देण्यात आले. पिडीत कुटूंब व एस.टी. च्या तसेच क्रिस्टलच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी त्रिशला नितीन शिंदे हिचे स्वागत केले आहे.
हालखीच्या परस्थितीत मुलांचे शिक्षण आणि उदरनिर्वाहासाठी सफाई काम करणार्‍या त्रिशलाचे या प्रामाणिक कामगिरीने सर्व स्थरातून कौतुक केले जात आहे.