Breaking News

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे वेतन थेट बँक खात्यात जमा होणार

नागपूर : राज्यातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे वेतन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या शिष्टमंडळाने आज ना. पंकजाताई मुंडे यांची नागपूर येथील त्यांच्या विधान भवनातील दालनात ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांसाठी भेट घेतली त्यावेळी त्यांनी ही माहिती सांगितली.
मंत्री मुंडे म्हणाल्या की,ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना विलंबाने वेतन मिळत होते. ते आता आँनलाइन करुन थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याने त्यांना आता वेळेत वेतन मिळणे शक्य होणार आहे. ग्रामपंचायत कर्मचा-यांना त्यांच्या पात्रतेनुसार वर्ग तीन आणि वर्ग चारच्या कर्मचार्‍यांइतके वेतन देण्याच्या उद्देशाने रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने नियुक्त केलेल्या समितीचा आहवाल लवकरच मागविण्यात येणार आहे.