Breaking News

बांधकाम कामगार विशेष नोंदणी अभियानास सुरूवात


राहुरी / ता. प्रतिनिधी 
बांधकाम क्षेत्राशी संबंधित विविध कामगारांसाठी कार्यरत असलेल्या विश्‍वकर्मा बांधकाम व इतर कामगार संघटनांच्या विद्यमाने महाराष्ट्र शासन कामगार विभागाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार, कल्याणकारी मंडळ अटल कामगार, विश्‍वकर्मा सन्मान योजना प्रचार रथाचे आज राहुरी शहरात बांधकाम व्यावसायिक इंजिनियर विश्‍वास धोंडे यांचे हस्ते पुष्पहार अर्पन करुन श्रीफळ वाढवून स्वागत करण्यात आले. शासनाच्या कामगार विभागाचा हा रथ बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी सरकार राबवत असलेल्या विविध योजनेचा राज्यभर प्रचार प्रसार करत आहे. सरकारने अटल विश्‍वकर्मा सन्मान योजना राबवताना सन्मान कष्टाचा आनंद उद्याचा हे घोषवाक्य घेत कामगार मंडळातर्फे बांधकाम कामगारांसाठी 28 विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. मंडळाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी वय वर्षे 18 ते 60 वयोगटातील कामगारांनी मंडळाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. बांधकाम कामगारांच्या नावनोंदणीकरिता मंडळातर्फे दि. 4 जुलै ते 4 ऑगस्ट 2018 या कालावधीत रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापुर, अहमदनगर, धुळे, नंदूरबार, नांदेड, परभणी, हिंगोली, चंद्रपुर, गोंदिया, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यांमधे विशेष नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानानिमित्ताने प्रचार रथ राहुरी शहरात आणला असता, याचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले, नाव नोंदणी झालेल्या कामगारांसाठी कल्याणकारी योजनेत शैक्षणिक सहाय्य योजना, आर्थिक सहाय्य योजना, आरोग्य योजना, सामाजिक सुरक्षा व अन्य योजनांचा समावेश असल्याची माहिती व प्रबोधन यावेळी करण्यात आले. विश्‍वकर्मा बांधकाम व इतर कामगार संघटनेच्या अहमदनगर जिल्हा शाखेने कामगारांचे नोंदणी अर्ज भरुन घेत, माहिती पुस्तिका वाटप केल्या. तसेच लाभार्थी ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी राहुरी शहर संघटनेच्या अध्यक्षपदी राहुरी शहरातील प्रसिध्द बांधकाम कॉन्ट्रॅक्टर शशिकांत साळवे यांची, उपाध्यक्षपदी मच्छिंद्र लोंढे, पोपट पवार यांची नियुक्ती करण्यात आली. या नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा यावेळी इंजिनियर विश्‍वास धोंडे पाटील यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. बांधकाम कामगारांसाठी कार्यरत असलेले विश्‍वकर्मा जिल्हा संघटनेचे सचिव श्रीराम परदेशी, राहुरी तालुकाध्यक्ष शरद परदेशी, सचिव बाळासाहेब कराळे, बांधकाम कामगार आदिनाथ भालेकर, भिमराज डूक्रे, अनिल चव्हाण, गणेश खांदे, बाबासाहेब बनसोडे आदी बांधकाम कामगार बहुसंख्येने उपस्थित होते.