अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणा सज्ज - चंद्रकांत पाटील
नागपूर : राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये 1 जून ते 9 जुलै या कालावधीत सरासरीच्या 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला असून 13 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. मुंबई व मुंबई उपनगर वगळता राज्यात आज अखेरपर्यंत 390 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 189 तालुक्यांमध्ये 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. 1 जून ते 9 जुलै 2018 अखेर राज्यात अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे 62 जणांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे उद्भवणाऱ्या आपत्तीजन्य परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी मंत्रालय नियंत्रण कक्ष व सर्व जिल्हास्तरीय यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. राज्य आपत्ती प्रतिसाद दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, कोस्टगार्ड, नागरी संरक्षण दले,भारतीय सेना, विविध महानगरपालिकेतील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आवश्यकतेप्रमाणे आपत्ती निवारणासाठी सज्ज असल्याचे मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले.