Breaking News

अमरधाम रस्ता अडला कुठे? गावकीत की राजकीय भावकीत !


यासीन शेख / जामखेड
शहरातील मध्यवर्ती असणारा मुख्य खर्डा चौक ते तपनेश्‍वर ते अमधाम मार्ग विकासाच्या दृष्टीने अगदी ग्रामपंचायत काळापासून वादग्रस्त राहिला आहे. तीस लाखाच्या खासदार निधीतून दुरूस्ती केलेल्या रस्त्याचे तीन महिण्याच्या आतच तीन तेरा झाले होते. त्यानंतर लगेचच नव्याने नगरपरिषदेची स्थापना झाली.
नगरपरिषदेच्या स्थापनेनंतर प्रथम या रस्त्यासाठी साठ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. वर्क ऑर्डरही मिळाली, मात्र नगरपरिषदेमधील अंतर्गत राजकीय भावकीच्या विरोधामुळे संबधित ठेकेदाराला काम करता आले नाही. अनेक महिने बंद पडलेल्या कामाचा ठराव व प्रस्ताव, तीन वेळा बदललेले राजकीय भावकीमुळे ठेकेदाराने काम सोडले. उपठेकेदार नेमले गेले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात नगरपरिषदेची सत्ता होती, राजकीय श्रेयावरून वेळोवेळी काम थांबवले. 
दरम्यान नगराध्यक्षाविरोधात अविश्‍वास ठराव आणून पालकमंत्री ना. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाच्या मुद्यावर नगरपरिषदेचे सत्तांतर घडवून आणत भाजपाने नगरपरिषदेची सत्ता हस्तांतरीत करून घेतली.
सत्तांतर झाल्यानंतर कोट्यावधी रूपयांचा निधी शहराच्या विकासासाठी पालकमंत्र्यांनी दिला. यामध्ये शहराच्या वैभवात भर घालणार्‍या व जामखेडकरांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणून तपनेश्‍वर रस्त्याच्या विकासासाठी चार कोटी सव्वीस लाख इतका भरीव निधी पालकमंत्री राम शिंदे यांनी मिळवून दिला. 
सदर कामाची ठेका प्रक्रिया पूर्ण होवून श्रीरामपूर येथील गूंजाळ यांना ठेका दिला. मात्र वर्क ऑर्डर इतके दिवस का दिली नाही, हा मोठा प्रश्‍न आहे. गावकी की राजकीय भावकी नेमके कोणामुळे काम रखडले आहे जनतेला वेठीस का धरले आहे? 
याच रस्त्यासाठी दि. 24 ऑगष्ट 2017 रोजी जिल्हाधिकारी यांना नागरिकांच्या शिष्टमंडळाने रस्ता लवकर करण्यासाठी विशेष विनंती केली होती, तर 24 फेब्रुवारी 2018 रोजी समस्त नागरिकांनी मूख्याधिकारी यांना तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. दि. 7 जुलै रोजी नागरिकांनी नेहमीच गैरहजर असणार्‍या मूख्याधिकार्‍यांच्या गैरहजेरीत कक्षाधिकारी महेंद्र तापकीरे यांना रस्त्याबाबत निवेदन दिले. शहरातील अत्यंत वादग्रस्त राहिलेल्या तपनेश्‍वर रोडचं काम तात्काळ होणे गरजेचे आहे. अन्यथा तपनेश्‍वर रोडने ये जा करणार्‍या अर्ध्या शहरातील नागरिकांना भर पावसाळ्यात पर्यायी रस्ता शोधणे किंवा उड्या मारून चालणे भाग पडेल.

काळ कोणताही असो जीवनाच्या, संघर्षाला प्रत्येक टप्प्यावर सामोरं जावं लागतच ही वस्तूस्थिती आहे. लोकसंख्या वाढली, शहराचा विस्तार वाढला, जूण्या गावठाणाच्या वर नव-नव्या वसाहती निर्माण झाल्या. ग्रामपंचायत काळातच मूलभूत गरज पाहून तपनेश्‍वर रोडलगत विंचरणा नदीच्या तीरावर स्मशानभूमी नव्याने निर्माण करण्यात आली. दुष्काळ व प्रतिकूल परिस्थितीबरोबर पिढ्यान्पिढ्या दोन हात करत जगण्याचा संघर्ष करणार्‍या जामखेडकरांचा अंतिम प्रवास सुखकर व्हावा म्हणून अमरधामची पायाभरणी झाली. जीवनाची वाट समस्यांनी भरलेली असतांना अंतीम श्‍वास घेतल्यानंतरही अमरधामकडे होणारी वाटचालही खडतर असल्याचा प्रत्यय सध्या जामखेडकरांना येत आहे. शेवटी अमरधामकडे जाणारा रस्ताच अडचणीचा व अडथळ्यांचा ठरला आहे.