Breaking News

चतुर्थीनिमित्त सिध्दटेकला भाविकांची गर्दी


कुळधरण: प्रतिनिधी - अष्टविनायकांपैकी एक असलेल्या कर्जत तालुक्यातील सिध्दटेक येथील सिध्दीविनायक गणपतीचे संकष्टी चतुर्थीनिमित्त राज्यभरातील हजारो भाविकांनी दर्शन घेतले. सकाळपासून सुरु असलेला भाविकांचा ओघ रविवारी रात्री चंद्रोदयानंतर ओसरला. मंदिराच्या उजव्या बाजूने भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. दर्शनासाठी प्रदक्षिणा मार्गावर भाविकांची रांग लागली होती. रविवारी सकाळपासुन भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती.पहाटे साडेपाच वाजता श्रीगणेशाची पुजा करुन नैवद्य दाखविण्यात आला. सकाळी आठ वाजेपासुन भाविकांच्या गर्दीचा ओघ वाढत गेला. बारामती,पुणे,नगर आदी भागातील भाविक सिध्दटेकला मुक्कामी आले होते. देवस्थानचे भक्तनिवासात राहण्याची व्यवस्था करण्यात आली. राज्याच्या विविध भागातील हजारो भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. रात्री चंद्रोदयानंतर मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भाविक मोठ्या संख्येने उपवास करतात. चंद्रोदयानंतर रात्री श्रीगणेशाची पूजा करून बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण करुन भाविकांनी उपवास सोडला. चिंचवड देवस्थानच्या वतीने मंदीर परिसरात जागोजागी बॅरिकेट्स लावुन भाविकांच्या रांगा नियंत्रित केल्या. ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने मंदीर परिसराची स्वच्छता ठेवण्यात आली. दर्शनरांगेवरील शेडचे काम अपूर्ण राहिल्याने ठिकठिकाणी मोकळ्या सांगाड्यांखालुन जात भाविक मंदिरापर्यंत पोहोचले. वाहतुक पोलिसांच्या अभावामुळे मंदिराला जोडणार्‍या सर्व रस्त्यावर वाहतुकीची सतत कोंडी होत होती. त्यामुळे भाविकांना ताटकळत रहावे लागले.

सुविधांच्या अभावाने भाविक त्रस्त
सिध्दटेकच्या मंदीर परिसरात कोलमडलेल्या पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेमुळे भाविकांची सोय झाली नाही. चिंचवड देवस्थानने पत्र देवुनही पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला नाही. जुने शौचालयाची दुरावस्था व नविन शौचालय बंद असल्याने महिलांची कुचंबणा झाली. सभामंडपाचे काम धिम्या गतीने सुरु असल्याने ते अर्धवट स्थितीत आहेत. फेब्रुवारी महिन्याची मुदत असणारे काम पावसाळा आला तरी पूर्ण झाले नसल्याने भाविकांचे हाल होत आहेत.