रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते उद्या चंद्रपूर आणि बल्लारपूर रेल्वे स्थानकांचा सन्मान
नवी दिल्ली : स्वच्छ व सुंदर रेल्वे स्थानकांच्या स्पर्धेत देशात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या चंद्रपूर आणि बल्लारपूर रेल्वे स्थानकांच्या कामगिरीसाठी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते दिनांक १२ जुलै २०१८ रोजी रेल्वे भवनात पारितोषिक वितरित करून सन्मान करण्यात येणार आहे.
रेल्वे स्थानक परिसरात कलात्मकतेचा उपयोग करून स्वच्छतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने रेल्वे मंत्रालयाने ‘सुंदर रेल्वे स्थानक’ या संकल्पनेवर आधारित स्पर्धेचे आयोजन केले. यात देशातील ११ रेल्वे विभागांतून ६२ प्रवेशिका रेल्वे मंत्रालयास प्राप्त झाल्या. स्पर्धेत महाराष्ट्रातील बल्लारशाह व चंद्रपूर रेल्वे स्थानकांनीपहिला क्रमांक मिळवत देशातील सर्वात सुंदर रेल्वे स्थानकाचा मान मिळविला. पुरस्कार स्वरूपात या दोन्ही रेल्वेस्थानकांना प्रत्येकी १० लाखांचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी रेल्वेचे अधिकारी, नागपूरच्या चित्रकला महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि राज्याच्या वनविभागाच्या सचिव उपस्थित राहणार आहेत.
