Breaking News

मुसळधार पावसाने मुंबईची दाणादाण लोकल उशिराने, रस्त्यांवर पाणीच पाणी

मुंबई : शहर आणि परिसरात सलग चवथ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे. रात्रीपासूनच मुंबईत पावसाचा जोर कायम आहे. काही काळ विश्रांतीनंतर पडणार्‍या पावसाचा फटका आजही रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला बसला आहे. सकाळपासूनच मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे आणि पश्‍चिम रेल्वेवरील लोकल गाड्या 15 मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे कार्यालयांमध्ये जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने रस्ते वाहतूक कासवगतीने सुरू आहे. मुंबईसह कोकणात पुढील पाच दिवसांमध्ये अतिवृष्टी होईल, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. रात्रभर मुंबईत जोरदार पाऊ स सुरू आहे. दिवस उजाडल्यावरही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे मध्य रेल्वेला पावसाचा फटका बसला आहे. सायन, माटुंगा, दादर, वरळी, लालबागमध्ये पावसाची संततधार सुरूच आहे. दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्‍चिम उपनगरांमध्येही मुसळधार पाऊस सुरू आहे. वांद्रे, अंधेरी, जोगेश्‍वरी, दहिसरला पावसाने चांगलेच झोडपले आहे. 

चेंबूर, टिळकनगर, घाटकोपर, कुर्ला पूर्व आणि पश्‍चिम, तसेच सायन स्टेशन, किंग्स सर्कल येथे पाणी भरले आहे. लोकलची वाहतूक अतिशय धीमी असून यामुळे लोकल सेवा 15 ते वीस मिनिटे सकाळपासून उशिराने सुरू आहे. तर, ईस्टर्न इस्प्रेस हायवेवर सायन किंग्स सर्कल येथे पाणी भरल्याने वाहतूक धीमी आहे. दुसर्‍या मार्गाने वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. महत्वाची बाब म्हणजे इतक्या पावसात धीम्या गतीने का होईना लोकल सेवा सुरू असल्याने चाकरमानी आपले कार्यालय किंवा इतर कामासाठी जात आहेत. हवामान खात्याने आजही अलर्ट दिला आहे. त्यामुळे दिवसभर पावसाचा तडाखा सुरू राहणार आहे. मुंबईकरांना त्यांच्या कार्यालयात पोहोचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच, जागोजागी साचलेल्या पाण्यामुळे डबेवाल्यांनीही आपली सेवा बंद ठेवली आहे.