Breaking News

चंद्रभागेचे पावित्र्य

श्रीक्षेत्र पंढरपूर हे भीमा नदीच्या तीरावर आहे. भीमा नदिला भिवरादेखील म्हणतात, ही नदी इथे अर्धचंद्राकार वाहते म्हणून तिला चंद्रभागा हे नांव आहे. वारकरी संप्रदायाची सर्वात पूजनीय असलेली चंद्रभागा नदी सर्वात जास्त प्रदूषित बनत चालली असून, सर्वाधिक मानवी विष्ठेचे विषाणू चंद्रभागेत आढळल्याचे स्फोटक वास्तव समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. राज्यातील तमम विठ्ठलभक्त आषाढी एकादशीनिमित्त आपल्या पांडूरंगाची भेट घेण्यासाठी पंढरपूराला येतात. मात्र पंढरपुरात सुयोग्य नियोजनाअभावी या चंद्रभागेच्या नदीच्या प्रदुषणात सातत्याने भरच पडत आहे. चंद्रभागेचे प्रदुषण रोखण्यासाठी आतापर्यंत कोणताही यशस्वी प्रयत्न झालेला नाही. या नदीप्रदुषणाचे मूळं पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये दिसून येतात. चंद्रभागेच्या पात्रात गावातील अनेक गटारे थेट जोडल्याचे आढळून येतात. त्यामुळे चंद्रभागा नदीच्या प्रदुषणात सातत्याने वाढ होत आहे. चंद्रभागा नदीच्या उगमाच्या पुढील काही अंतरावर औद्योगिक वसाहती, खाजगी व सहकारी साखर कारखाने, यांचे सांडपाणी सोडल्याचे दिसून येते. तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्याचे धाडस राज्य सरकारकडून दाखवण्यात आलेले नाही. परिणामी औद्योगिक वसाहतीकडून होणारे प्रदुषण, आणि वारकर्‍यांसाठी आषाढी एकादशीनिमित्त अपुर्‍या सोयी सुविधामुळे चंद्रभागा नदीतच होणारे स्नानासह इतर प्रक्रियामुळे ही नदी प्रदुषित होत आहे. मानवी विष्ठेतील विषाणूंची संख्या प्रतिलिटर 2 ते 5 हजारांवर पोचल्याचे स्फोटक वास्तव समोर आणले आहे. जे पाणी आजही लाखो भाविक पिण्यासाठी वापरातात. लाखो वारकरी पवित्र तीर्थ म्हणून घेतात, त्या पाण्यात मानवी विष्ठेतील सर्वात जास्त विषाणू आहे. हे चिंताजनक असून, राज्यसरकारने यासाठी लवकरच उपाययोजना आखण्याची गरज आहे.