मणिपूरमध्ये भूस्खलन होऊन 9 जणांचा मृत्यू
तामेंगलांग - मणिपूर राज्यातल्या तामेंगलांग जिल्ह्यात बुधवारी सकाळी 3 ठिकाणी भूस्खलन झाल्याने 9 लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 7 जणांचे मृतदेह हाती लागले असून 2 जणांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरु आहे. तामेंगलांग जिल्हा इंफाळपासून 156 किलोमीटरवर आहे. या भूस्खलनामुळे मातीखाली अनेक घरे गाडली गेली आहेत. अडकलेल्या लोकांपर्यंत मदत पोहोचेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. पावसाळा सुरु झाल्यापासून राज्यात अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याच्या घटना घडल्या आहेत. रविवारी राष्ट्रीय महामार्ग 2 वर भूस्खलन झाले होते. त्यामुळे कोहिमा-दीमापूर रस्त्यावरील वाहतूक खंडित झाली होती.
