Breaking News

पांगरमल विषारी दारूकांड प्रकरणी 2 पोलिसांवर बडतर्फीची कारवाई

पांगरमल येथे झालेल्या विषारी दारूकांड प्रकरणातील आरोपींशी सातत्याने संपर्कात असल्याचा ठपका ठेवून जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांनी 2 पोलिसांना नोकरीतून बडतर्फ करण्याची कारवाई केली आहे.तसेच अन्य 3 पोलीस कर्मचा-यांची वेतनवाढ एक वर्षाकरिता रोखण्याची देखील कारवाई करण्यात आली आहे. पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र गायकवाड व पोलीस नाईक शब्बीर शेख अशी बडतर्फीची कारवाई झालेल्या पोलिसांची नावे आहेत.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या वेळी नगर तालुक्यातील पांगरमल येथे प्रचार करणारे कार्यकर्ते व अन्य लोकांकरिता शिवसेना उमेदवारांनी पार्टीचे आयोजन केले होते.या पार्टीत विषारी दारू पिण्यात आल्याने तब्बल 11 जणांचा मृत्यु झाला व अनेकांना कायमचे अपंगत्व आले.या घटनेमुळे संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली होती .विशेष म्हणजे पांगरमल येथील पार्टीत देण्यात आलेली सदरची विषारी दारू अहमदनगरमधील जिल्हा सरकारी रूग्णालयाच्या कँन्टिनमध्ये तयार केली जात असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते.पोलिसांनी तपासाअंती 19 जणांविरूध्द गुन्हा दाखल करून 18 जणांना अटक केली होती.मात्र पांगरमल विषारी दारूकांड प्रकरणा नंतर पोलिसांचे आरोपींशी लागेबांधे असल्याचे आरोप मोठ्या प्रमाणावर करण्यात आले होते.या पार्श्वभूमीवर तत्कालीन जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभ त्रिपाठी यांनी श्रीरामपूरचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक यांची समिती चौकशीसाठी नियुक्ती केली होती.काही दिवसांपूर्वीच या समितीने आपला अहवाल जिल्हा पोलीस अधिक्षक यांना सादर केला आहे.या अहवालात पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र गायकवाड व पोलीस नाईक शब्बीर शेख यांचे पांगरमल दारूकांड प्रकारातील प्रमुख आरोपी शाकीर शेख व जगजितसिंग उर्फ जितू गंभीर यांच्याशी सातत्याने संपर्क असल्याचा व त्यांनी आरोपींना अवैध धंदे करण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.पोलीस अधिक्षक शर्मा यांनी या अहवालाच्या आधारे पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र गायकवाड व पोलीस नाईक शब्बीर शेख या दोघांना पोलीस खात्यातूनच बडतर्फ करण्याचा आदेश दिला आहे.