Breaking News

अ.भा.म.सा. संमेलनाध्यक्ष बिनविरोध निवडीच्या प्रस्तावात सातारकरांचे मोठे योगदान - विनोद कुलकर्णी

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड ही निवडणुकीव्दारे न होता बिनविरोध व्हावी यासाठी आम्ही सर्व सातारकर आग्रही होतो, त्यामुळेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळात घटनादुरुस्ती होऊ शकली. त्यामध्ये सातारा जिल्ह्याच्या साहित्य परिषदेचे मोठे योगदान आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे प्रतिनिधी विनोद कुलकर्णी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.दोन वर्षापूर्वी महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक झाली. तेव्हापासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षाची निवड बिनविरोध व्हावी यासाठी पाठपुरावा सुरु होता. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळावर निवड झाल्यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या बैठकीत पहिल्यांदा सातारा जिल्ह्याच्या वतीने कुलकर्णी यांनी संमेलनाध्यक्षाची निवड सन्मानाने व्हावी, निवडणुकीव्दारे होऊ नये असा प्रस्ताव मांडला. संमेलनाध्यक्ष फक्त एक हजार व्यक्तींकडून ठरवले जाते. ते समाजमान्य नाही. निवडणुकीमुळे अनेक मान्यवर लेखकांना संमेलनाध्यक्षाची संधी मिळालेली नव्हती त्यात मंगेश पाडगांवकर, विंदा करंदीकर आणि अशा अनेक साहित्यिकांची नावे सांगता येतील. विश्व साहित्य संमेलन आणि अखिल भारतीय मराठी नाटय संमेलन यांचीही निवड बिनविरोध होते आणि सन्मानपूर्वक ते पद दिले जाते तर मग अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षाची निवड का नाही अशी भूमिका मांडली होती. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी हेही या मताला अनुकुल होते. प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यापक भूमिका घेतली आणि 57 वर्षे जी प्रथा सुरु होती ती बदलण्यासाठी हा ठराव मंजूर करावा अशी विनंती त्यांनी केल्यानंतर मसापच्या कार्यकारिणीने ती एकमताने मान्य केले. नुकत्याच नागपूर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत मसापच्या या भूमिकेमुळे बिनविरोध संमेलनाध्यक्ष निवडीवर शिक्कामोर्तब करणारी घटना दुरुस्ती झाली.