Breaking News

पोलीस आयुक्त साहेब! म्हातारीच्या शोकात काळ सोकावेल म्हणून...

कुमार कडलग/नाशिक। पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांची कार्यशैली वादातीत आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने उल्लेखनीय असली तरी त्यांच्या अखत्यारीतील शहर वाहतूक शाखेचा एकूण क ारभार संशयास्पद असल्याचा जनमानस पोलीस आयुक्तांच्या कामगीरीला झाकोळू लागला आहे. मनपा प्रशासन आणि शहर वाहतुक शाखेत असलेला असमन्वय आणि वाहतुक शाखा ठेकेदारांची अरेरावी पोलीस आयुक्तांच्या कामगीरीला ग्रहण लावण्यास प्रमुख जबाबदार असून पोलीस आयुक्तांच्या कर्तव्यदक्षतेसह सामान्य नाशिककरांना मनस्ताप सोसावा लागत आहे.

नाशिक शहरात वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार दोन, तीन आणि चारचाकी खासगी वाहनांची संख्याही वेगाने वाढली आहे. शहरातील रस्तेही उपलब्ध जन आणि वाहन संख्येला पुरक आहेत. तरीही वाहतुक कोंडी नाशिककरांसह पोलीसांच्या डोक्याला नेहमीचा ताप ठरली आहे, यावर उपाय म्हणून शहर वाहतुक शाखेने नो पार्कींग झोन जाहीर क रीत वाहने उचलून दंड आकारण्याची मोहीम धडाक्याने राबविण्यास सुरूवात केली. मात्र या मोहीमेतून मुळ प्रश्‍न सुटण्याऐवजी जटील बनला. वाहतुक कोंडी सोडविणे हा मुळ हेतू साध्य झाला नाही, मात्र यातून नवी दुकानदारी मात्र नफ्यात आली.
या जटील समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न शहर वाहतूक शाखेच्या म्होरक्यांनी प्रामाणिकपणे केल्याचे स्मरत नाही. या प्रश्‍नाचे मुळ मनपा प्रशासन आणि शहर वाहतुक शाखेच्या असमन्वयात आहे. नाशिककरांनी आपल्या खासगी वाहनांचे सर्व कर भरले आहेत. मनपाचे करही अदा केले आहेत. म्हणून नाशिककरांना पुरेशी पार्कींग उपलब्ध करून देणे मनपाची प्राथमिक जबाबदारी आहे. ही जबाबदारी पाडली गेली नसताना वाहतुक कोंडीचे खापर करदात्या नाशिककरांवर फोडून शहर वाहतूक शाखा आपले कर्तव्य पार पाडताना आततायीपणा आणि कायद्याचा अतिरेकी वापर करतांना दिसते आहे.
शहर वाहतुक शाखेकडून ज्या वाहतुक कोंडीचेनिमित्त करून नो पार्कींग झोनवर कारवाई केली जात आहे, ही कारवाई किती प्रामाणिकपणे केली जाते यावर शंका घेण्याइतपत वस्तुस्थिती आहे.
पहिली गोष्ट ही की, शहरात केवळ आणि केवळ दुचाकी वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होते, असा जावई शोध शहर वाहतुक शाखेने लावला असल्याने चार चाकी वाहन उचलायचे नाहीत अशी शपथ घेतली आहे.आणि ही वाहतुक कोंडी फक्त विशिष्ट भागातच होते असे वाहतूक शाखेचे निरिक्षण असल्याचे त्यांच्या कारवाईतून जाणवते.
जिथे खर्‍या अर्थाने वाहतुक कोंडी होते, किंवा चार चाकी वाहनांच्या पार्कींगची वर्दळ असते तिथे कारवाई करण्याचे धाडस शहर वाहतूक शाखा दाखवत नाही. चार चाकी वाहनाशेजारी उभी असलेली दुचाकी उचलताना कर्तव्यावर असलेले पोलीस आणि ठेकेदार कर्मचार्‍याना शेजारची चार चाकी अजिबात दिसत नाही. हा मुद्दा एखाद्या जिज्ञासूने उपस्थित केलाच तर ठेकेदाराच्या मदतीला पोलीस धावून येतात आणि आत टाकण्याची धमकी देतात. न्यायाची भिक नको पण धमकीचे कुत्रे आवरा असे म्हणून तो जिज्ञासू क ाढता पाय घेतो, वकीलवाडी, म. गांधी रोड या परिसरात हे दृश्य दररोज पहायला मिळते. वकीलवाडीत तर काही धनदांडग्या व्यवसायिकांच्या पार्कींगबाहेर चार चाकी वाहने उभी केलेली असल्याने वाहतुक कोंडी नित्याची बनली आहे. या वाहतुक कोंडीचा फटका ट्युईंग वाहनाला बसूनही त्या चारचाकीला उचलण्याची हिम्मत दाखवली जात नाही.
एखादा दुचाकी चालक रूग्णाला घेऊन रूग्णालयात पाय ठेवतो किंवा औषधे घेण्यासाठी मेडीकलमध्ये उभा असतो तोच त्याची दुचाकी वाहतुक शाखेच्या ताब्यात असते. विनवण्या करूनही दया दाखवली जात नाही. पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांचे पोलीस एवढे निर्दयी असू शकतात यावर नाशिककरांचा सहजासहजी विश्‍वास बसत नसला तरी दुसर्‍या बाजुला वास्तव नाकारताही येत नाही.
हे वास्तव दिवसागणिक गंभीर बनत असल्याने पोलीस आयुक्तांनी तात्काळ हस्तक्षेप करणे काळाची गरज बनल्याचे नाशिककरांचे म्हणणे आहे. नाशिककरांच्या या भावना प्राति निधीक स्वरूपात प्रशासनापर्यंत पोहचविण्याचे काम नॅशनलिस्ट कन्झुमर प्रोटेक्शन आर्गनायझेशन या संघटनेने केले आहे. या संघटनेने पोलीस आयुक्तांसह जिल्हाधिकार्‍यांपर्यंत ना शिककरांच्या भावना पोहचविल्या असून पोलीस आयुक्त शिरस्त्याप्रमाणे योग्य दखल घेतील, अशी खात्री आहे. डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांचा कामाचा आवेग पहाता यातून नक्की मार्ग निघेल अन्यथा म्हातारी मेल्याचा शोक करण्याच्या नादात काळ कधी सोकावला? असा प्रश्‍न विचारण्याची नामुष्की ओढावणे अटळ आहे.