Breaking News

राज्यात 48 तासात गारपिटीसह मुसळधार पावसाचा अंदाज यंदा वेळेआधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता

पुणे : हवामान खात्याकडून पुढील 48 तासांत राज्यात गारपिटीसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याबरोबरच दक्षिण कोकण व मराठवाड्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रायगड आणि पश्‍चिम महाराष्ट्रात गारपीट होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मात्र शेतकरी वाट पाहत असलेला मान्सून 6 जूननंतर राज्यात दाखल होणार असल्याची माहिती देण्यात आली. गेल्या वर्षी 8 जूनला मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला होता. यंदा 7 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात प्रवेश करेल, असे हवामान खात्याने म्हंटले आहे. यावर्षी मान्सून एक दिवस आधीच महाराष्ट्रात धडक देण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. मान्सूनचा केरळातील वेग पाहता, महाराष्ट्रात एक दिवसआधी म्हणजे 6 जूनला दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. केरळमध्ये मान्सूनने दोन दिवस आधीच धडक दिली आणि आता तो गोव्यात सक्रीय होत आहे. सध्या महाराष्ट्रात मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. उकाड्याने हैराण मुंबईकरांना मान्सून पूर्व पावसाच्या सरींनी सुखावले आहेत. येत्या 24 ते 48 तासात मुंबई आणि उपनगरात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
राज्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. पुणे-मुंबईसह राज्यात सर्वत्र वादळी वार्‍यासह व गडगडाटासह वरूणराजा कोसळत आहे. येत्या 48 तासांत राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने आहे. खासकरून मराठवाड्यात जोरदार पाऊस कोसळेल असा अंदाज व्यक्त केला आहे. परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड परिसरात मुसळधार पाऊस कोसळेल असे हवामान खात्याने म्हटले आहे. वादळी वारे व गडगडाटासह व वीज कोसळण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकरी व नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.