पुणे महापालिका शिक्षण विभागाच्या विद्यार्थिनींना दरमहा मोफत सॅनिटरी नॅपकिन देण्यात येणार
पुणे, दि. 21, जून - पुणे महापालिका शिक्षण विभागाच्या इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थिनींना दरमहा मोफत सॅनिटरी नॅपकिन देण्यात येणार आहेत. त्याबाबतच्या प्रस्तावाला काल स्थायी स मितीने मंजूरी दिली. त्यानुसार शहरातील महापालिका शाळेच्या 25 हजार 864 विद्यार्थीनींना सॅनिटरी नॅपकिन पुरवण्यात येणार आहेत. त्यासाठीच्या 49 लाख 65 हजाराची तरतुद करण्यात आली असून त्याला मान्यता दिल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी दिली.
महापालिका शाळेतील विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन देण्याच्या प्रस्तावाला महिला आणि बालकल्याण विभागाने मान्यता दिली होती. त्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला होता. या योजनेचा अंतर्गत पहिल्या टप्प्यात दरमहा मोफत सॅनिटरी नॅपकिन वाटप केले जाणार आहे. तर दुसर्या टप्प्यात सॅनिटरी नॅपकिनची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्याची यंत्रणा उभारण्यात येणार आहे. तसेच पुढील टप्प्यात व्हेंडीग मिशिन बसवण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महिला आणि बालकल्याण समितीच्या अध्यक्षा राजश्री नवले यांनी मांडला होता, त्याला काल स्थायी समितीकडून मान्यता देण्यात आली.