सभागृहनेते आणि काँग्रेस गटनेत्यांमध्ये झालेला वाद संपला
पुणे, दि. 21, जून - पुणे महापालिकेचे सभागृहनेते आणि काँग्रेस गटनेत्यांमध्ये झालेल्या सभागृहातील शाब्दिक चकमकीवर आज अखेर पडदा पडला आहे. त्यामुळे न्यायालयापर्यंत पोहचलेला पुणे महापालिका सभागृहाचा वाद हा परस्पर सहमतीने मिटवण्यात आला आहे.
महापालिकेच्या 21मे झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आणि काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांच्यात वयक्तिक वाद झाला होता. त्यावरून शाब्दिक चकमक होऊन हा वाद पोलिक स्टेशन आणि न्यायालयापर्यंत पोहचला होता. आज झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये महापौरांनी सभागृहाचे पवित्र सर्व सभासदांकडून राखले जावे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन सर्व नगरसेवकांना केले. त्यावर सभागृहनेते भिमाले यांनी वादावर पडदा टाकला. त्याला प्रतिसाद देत शिंदे यांनीही सभागृहाचे पवित्र राखले जाईल तसेच अशा प्रकारचे वर्तन इथून पुढे होणार नाही अशी ग्वाही दिली. अशाप्रकारे अनेक दिवस चर्चेत असलेला हा वाद अखेर मिटला.