Breaking News

अग्रलेख - मातीशी इमान राखणारा अवलिया !

कृषी क्षेत्रात संशोधन करण्यासाठी माती परीक्षण, हवामानाचा अंदाज, पाण्याची उपलब्धता व नियोजन, कमी काळात, कमी वेळात, शरीराला पोषक अन्नद्रव्व्ये असणारी पिके, मानवी आरोग्य, बाजारपेठेतील अस्थिरता लक्षात घेऊन बाजारपेठेत चांगला भाव मिळणारी पिके, कोरडा व ओला दुष्काळ त्या अनुषंगाने असणार्‍या विविध योजना, सेंद्रिय शेती, स्थानिक वातावरणात तग धरणारी व जास्त उत्पादकता, उत्त्पन्न मिळून देणारी पिके, बी बियाणांची उपलब्द्धता, जमीन व पिकांचे योग्य संगोपन या संपूर्ण बाबीचा विचार संशोधनात होतो, मात्र या संपूर्ण बाबीचे अवलोकन करण्यासाठी, संशोधन करण्यासाठी लागणारे साहित्य, शास्त्रशुध्द पध्दत याचा संगम असावा लागतो. मात्र या संपूर्ण बाबींचा कुठलाही लवलेश नसतांना, शालेय जीवनाची पाठी कोरी असतांना देखील, आपली मातीशी असलेली नाळ घट्ट ठेवत, अपार कष्ट उपसत तांदुळाच्या नऊ वाण विकसित करण्याचे कठीण काम धान संशोधक दादाजी खोब्रागडे यांनी पूर्ण केले. कुठलेही शिक्षण नसल्यामुळे साहजिकच शास्त्रशुध्द शिक्षणांचा अभाव, कायमच गरीबीचा सामना करावा लागल्यामुळे संशोधनाच्या कोणत्याही सोयीसुविधा नसतांना देखील दादाजी खोब्रागडे यांनी भाताचे(धान) एक-दोन नव्हे तर तब्बल नऊ वाण विकसित करण्याचा अनोखा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. असा हा अवलियाचा जन्म नांदेड जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील. जेमतेम तिसरीपर्यंतचे शिक्षण घेतलेले दादाजी 1983 मध्ये तांदळाचे संशोधक म्हणून नावारूपाला आहे. मात्र संशोधक म्हणून त्यांची दखल घेण्यासाठी त्यांना खूप मोठी तपश्‍चर्या करावी लागली, त्यासाठी अपार कष्ट उपसावे लागले. दादाजी यांच्याकडे असलेल्या जेमतेम शेतीत रोज नवनवीन प्रयोग करण्यातच त्यांचा दिवस जात असे. निसर्ग, आणि जमिनीचा एक तुकडा हीच त्यांची प्रयोगशाळा. याचप्रयोगशाळेत निसर्गांच्या लहरी स्वभावावर विश्‍वास ठेवून त्यांचे संशोधन सुरू असे. याच मेहनीच्या जोरावर व आपली नाविण्य वापरत, कल्पनाशक्तीला आकार देत, त्यांनी तांदूळ क्षेत्रातील संशोधन कार्य सुरू ठेवले. याच प्रयत्नाचा जोरावर त्यांनी एच.एम.टी.सारखा शेतकरीभिमुख वाण त्यांनी विकसित केला. त्यानंतर आजवर त्यांच्या नावे नऊ वाण संशोधनाची नोंद आहे. यानंतरची त्यांची कडी म्हणजे, त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य संशोधनाशी वाहून घेतले. याच प्रयत्नातून त्यांनी एच.एम.टी., विजय नांदेड, नांदेड 92, नांदेड हिरा, डीआरके, नांदेड चेन्नूर, नांदेड दीपक, क ाटे एच.एम.टी. आणि डीआरके-2 अशाप्रकारचे नऊ तांदूळ वाण त्यांनी विकसित केले आहेत.  दीड एकर शेतीत संशोधनकार्य करणार्‍या दादाजी खोब्रागडे यांच्या कार्याची दखल घेत 2010 मध्ये फोर्ब्जने जगातील सर्वोतम ग्रामीण उद्योजकांच्या यादीत त्यांना स्थान दिले होते. त्यानंतर तत्कालीन राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी 50 हजार रुपये तसेच स्मृतिचिन्ह देऊन गौरविले, तर राज्य सरकारने देखील त्यांचा कृषिभूषण पुरस्काराने सन्मान केला. असे असले तरी आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांची परवडच झाली असे म्हणता येईल. आयुष्याच्या शेवटी उपचारासाठी त्यांच्याजवळ पैसा नव्हता. दादाजी यांनी जर मनात आणले असते, तर संशोधनाच्या बळावर त्यांना आपले आयुष्य सुखासीन जगता आले असते. मात्र आपले संशोधन कोणत्याही कंपनीला देण्यासाठी त्यांनी विकसित केलेले वाण सर्वसामान्यांसाठी त्यांनी उपलब्ध करून देण्याचा नेहमीच प्रयत्न केला. परिणामी त्यांच्या वाटेला कायम गरिबीचा सामना करावा लागला. शासकीय स्तरावरून देण्यात आलेली आर्थिक मदत देखील तुटपुंजी असल्यामुळे दादाजी यांना कुढत जीवन जगावे लागले. असे असले, तरी दादाजी यांनी आपला स्वामीमान कधीही गहाण ठेवला नाही.