Breaking News

बनावट मतदार प्रकरणी 4 समित्या स्थापन निवडणूक आयोगाचे आदेश

नवी दिल्ली - काँग्रेसकडून करण्यात आलेल्या बनावट मतदान प्रकरणातील आरोपींची चौकशी करण्यासाठी निवडणूक आयोगाने सोमवारी 4 समित्यांची स्थापना केली आहे. नरेला, भोजपूर, होशंगाबाद आणि सियोनी माळवा विधानसभा मतदार संघात 4 समित्या स्थापन केल्या आहेत. काँग्रेसने मध्य प्रदेशात लाखो बनावट मतदारांची नोंदणी झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या चारही मतदार संघात मतदार याद्या प्रमाणित करण्यासाठी या समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. सोमवारपासून या समितीतले सदस्य याप्रकरणाच्या तपासाला सुरूवात करणार असून सात जूनपर्यंत आपला अहवाल सादर करणार आहेत. संबंधित विधानसभा मतदार संघात एका मतदाराची वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या विधानसभा क्षेत्रात नोंदणी झाली आहे. यावर काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केली आहे. यानंतर काही तासांतच निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. राज्यात साधारणपणे 60 लाख बनावट मतदार आहेत आणि हे सर्व सत्ताधारी भाजपच्या म्हणण्यावर केले जात आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. मध्य प्रदेश काँग्रेस अध्यक्ष कमलनाथ यांनी सांगितले, की यासंदर्भात आयोगाला पुरावे देण्यात आले आहेत. या यादीत साधारणपणे 60 लाख बनावट मतदार आहेत.