Breaking News

१० लाखांचे दागिने धूमस्टाईलने पळविले


राहाता प्रतिनिधी : शहरातील नगर-मनमाड महामार्गावर युनियन बँकेच्या लॉकरमधून घेतलेली १० लाखांच्या ३१ तोळे दागिन्यांची पिशवी अज्ञात दुचाकीवरून आलेल्या चोरटयांनी धूमस्टाईलने हिसकावून नेली.याप्रकरणी राहता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

युनियन बँकेतील सेवानिवृत्त कर्मचारी रखमाजी कलाप्पा शिंदे ( रा. त्रिशुलनगर, राहाता) हे येथील युनियन बँकेच्या शाखेत दुपारी ३ वाजेनंतर बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिणे घेण्यासाठी गेले होते. त्यांनी बँकेतून साडे एकतीस तोळे सोन्याचे दागिणे असलेली पिशवी ताब्यात घेतली. त्यानंतर काहीवेळाने बँकेतून ते जवळच असलेल्या त्यांच्या दुकानाकडे नगर-मनमाड महामार्गावरून पायी जात होते. त्याचवेळी त्यांच्या पाठीमागून दुचाकीवर आलेल्या अज्ञात चोरटयांनी त्यांच्या हातातील दागिण्यांची पिशवी हिसकावून घेत धूमस्टाईलने चोरून नेली. आरडाओरडा व लोक गोळा होईपर्यंत चोरटे पसार झाले. सदरची घटना पाळत ठेऊन झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला. रखमाजी शिंदे बँकेत असतांना त्यांच्या आजूबाजूला संशयित व्यक्ती पाळत ठेऊन असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये निदर्शनास येत आहे.