परिवर्तनवादी चळवळीच्या कार्यकर्त्यावर हल्ला
राहुरी ता. प्रतिनिधी
शहरातील नगर-मनमाड रोडवर परवा {दि. १७ } रात्री १० च्या सुमारास परिवर्तनवादी चळवळीचे काम करणाऱ्या भारत मुक्ती मोर्चा संघटनेचे कार्यकर्ते संतोष वाघमारे यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी राहुरी विद्यापीठ जवळ पाठलाग करत प्राणघातक हल्ला केला. या भ्याड हल्ल्याविरोधात पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी राहुरी तालुक्यातील अनेक परिवर्तनवादी चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित होते. या निवेदनानुसार अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
छत्रपती शिवराय, फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते संतोष भाऊसाहेब वाघमारे हे त्यांचे वैयक्तिक काम आटोपून नगरकडून राहुरीच्या दिशेने येत होते. विद्यापीठ परिसरातील वळू प्रकल्पाजवळील गेट क्र. २ येथे रस्त्याच्या कडेला लघुशंकेसाठी ते थांबले होते. एवढ्यात एक लाल रंगाची दुचाकीवर चेहऱ्याला रुमाल बांधलेले तीन युवक तेथे आले. काही कळण्याच्या आत या युवकांनी वाघमारे यांच्यावर जीवघेणा हल्ला करत त्यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात त्यांना गंभीर जखमा झाल्या आहेत.
यासंदर्भात पोलिस प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, बहुजन महापुरुषांचे विचार सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम आमचे कार्यकर्ते अविरतपणे करत असतात. त्यांच्यावर होणारे असले भ्याड हल्ले निंदनीय आहेत. पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते सुरक्षित नाहीत, हेच या हल्ल्यावरून दिसत आहे. शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर चळवळीचे विरोधक या हल्ल्यामागे असल्याचा संशय कार्यकर्त्यांनी वर्तविला आहे. या सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींना अटक करावी. अन्यथा आगामी काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या निवेदनाद्वारे प्रशासनाला देण्यात आला.
पोलिस प्रशासनाच्यावतीने श्रीरामपूरचे पोलिस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनावर देवेंद्र लांबे, प्रशांत शिंदे, संजय संसारे, बाळासाहेब जाधव, कांतीलाल जगधने, आर. आर. जाधव, संदीप पाळंदे, सचिन गायकवाड, विजय भोसले, अजित गायकवाड, हरून खान, सुदर्शन बोर्डे, प्रकाश आदी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
