पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी चिंताक्रांत!
सुपा प्रतिनिधी
संपूर्ण राज्यभरासह पारनेर तालुक्यातदेखील पावसाने सध्या दांडी मारली आहे. त्यामूळे तालुक्यातील अनेक शेतकरी अडचणीत आले आहेत. जून सुरू होताच पाऊस होणे अपेक्षित होते. परंतु अर्धा जून सरून गेला. मात्र तालुक्यात काही पाऊस पडला नाही. त्यामुळे तालुक्यातील बळीराजासमोर दुबार पेरणीचे संकट ‘आ’वासून उभे राहिले आहे.
पारनेर तालुक्यातील सुपा, वाळवणे, रुईछत्रपती, वाघुंडे, टाकळी ढोकेश्वेर, कन्हूर पठार, किन्ही डिकसळ,करंदी आणि परिसरात या मोजक्याच गावात जूनच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात काही प्रमाणात पाऊस झाला. बाकी संपूर्ण तालुका अजून कोरडाठाक आहे. पहिल्या पावसातच सुपा परिसरातील वाळवणे, रुईछत्रपती, पिंपरी गवळी, रांजणगाव मशिदी, रुईछत्रपती, आपधूप, बाबुर्डी, भोयरे गांगर्डा, कडूस, वाघुंडा, म्हसणे, जातेगाव, पळवे, घाणेगाव, नारायणगव्हाण आदी भागात शेतकऱ्यांनी खरिप हंगामातील मूग, बाजरी, मका आदी पेरण्या मोठ्या प्रमाणात केल्या. त्याची उगवणही चांगली झाली. मात्र पावसाने दडी मारल्याने ही पिके सुकू लागली आहेत. आणखी दोन ते चार दिवस पावसाने हजेरी न लावल्यास दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांपुढे ठाकले आहे.
पाऊस झालेल्या भागातील शेतकरीदेखील अडचणीत आले आहेत. या भागात लाखो रुपयांच्या वटाणेच्या पेरण्या झाल्या आहेत. पाऊस झाल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्याच दिवशी तेथील शेतकऱ्यांनी वाटाणा बी खरेदी करण्यासाठी कृषी केंद्रात मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. तालुक्यात यावर्षी विक्रमी वाटाण्याच्या बियाण्याची विक्री झाल्याचे या भागातील कृषी सेवा केंद्र चालक सांगत आहेत. काही शेतकऱ्यांनी दोन ते पाच वाटाण्याच्या गोण्या पेरल्या आहेत. सध्या मान्सूनचा पाऊस अचानक गायब झाल्याने तसेच पूर्वमान्सून पाऊस समाधानकारक न झाल्याने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. परिणामी यामुळे हजारो रुपयांचे बियाणे जाणार आहे. इतर भागात पेरण्या खोळंबलेल्या असून पठार भागांतील शेतकऱ्यांनी अपुऱ्या ओलीवर वाटाण्याच्या पेरी केल्या होत्या. पण आता पाऊस न झाल्याने केलेल्या पेरी वाया जाऊ शकतात.
चौकट
… लाखोंचे बियाणे जाणार वाया
मृग नक्षत्राच्या आधी तालुक्यातील काही भागात पाऊस झाल्याने शेतकरी वर्ग आनंदीत झाला होता. या वर्षीदेखील मागील वर्षीप्रमाणे चांगला पाऊस होईल, असा कयास तेव्हा लावण्यात आला. मोठ्या प्रमाणात पेरण्या झाल्या. त्यात मूग, बाजरी, मका वटाण्याच्या मोठय़ा प्रमाणात पेरण्या झाल्या. परंतु मृगनक्षत्र सुरू होताच पावसाने दांडी मारली व अचानक जोरात वारे सुरू झाले. वाऱ्यामुळे जमिनीत असणारा ओलावा गायब झाला. ढग येत असल्याने त्याचा फटका बोअरवेल व विहिरीच्या पाण्याला बसला आहे. ते पाणी कमी पडले आहे. या आठवड्यात पाऊस झाला नाही तर पेरणी केलेले लाखो रुपयांचे बियाणे वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
