Breaking News

सराफ विद्यालयात स्नेहमेळावा उत्साहात


संगमनेर प्रतिनिधी
सोयी सुविधांचा अभाव असतानाही नव्यानेच उभारण्यात येत असलेल्‍या शाळेला तत्कालीन माजी विद्यार्थ्यांनी मानले. १९८९ पासून खऱ्या अर्थाने संस्थेचा नावलौकिक सुरू झाला. त्यावेळी असलेले शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांनी परिश्रमाने साध्य केलेला यशस्वी शैक्षणिक प्रवास हे खऱ्या अर्थाने दिगंबर गणेश सराफ विद्यालयाचा सुवर्णकाळ ठरला, अशा शब्दांत निवृत्त शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांनी तब्बल ३० वर्षांनंतर एकमेकांची संवाद साधत भावना व्यक्त केल्या. 

येथील दिगंबर गणेश सराफ विद्यालयातून शिक्षण घेतलेल्या १९८९ च्या शैक्षणिक वर्षांतील माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. राज्यात विविध ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत असलेले माजी विद्यार्थी, विद्यार्थीनी तब्बल तीस वर्षांनी एकत्रित आले होते. या मेळाव्याच्या निमित्ताने निवृत्त शिक्षकांचा स्मृतिचिन्ह देवून कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला. प्रारंभी सराफ विद्यालयातील निवृत्त कलाशिक्षक कै. गोविंद विश्वनाथ गांधी माजी विद्यार्थी संतोष दुर्गूडे, शैलेश डोंगरे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. 

स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पहील्या सत्रात उपस्थित माजी विद्यार्थी विद्यार्थीनीनी शिक्षणानंतर केलेल्या यशस्वी वाटचालीचे अनुभव कथन केले. आयुष्याची वाटचाल करताना संघर्ष करावा लागला असला तरी शाळेची शिस्त, शिक्षकांचे संस्कार आणि विद्यार्थी जीवनात चांगल्या वातावरणाचे सानिध्य मिळाल्यामुळे आज आहे त्या क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत असल्याचे अनेकांनी नमूद केले. 

दुसर्‍या सत्रात निवृत्त शिक्षकांशी आयोजित करण्यात आलेल्या संवादाच्या कार्यक्रमास सराफ विद्यालयाचे निवृत्त प्राचार्य ए. टी. जोशी, राजेंद्र वेल्हाळ, राधाकृष्ण मेहेर, प्रल्हाद आरोटे, योगाचार्य आर. एस. लेंडे, अशोक भारंबे, शहाणे हारेर, श्रीमती पद्मावती बागूल आदी याप्रसंगी उपस्थित होते. 

या सर्वच शिक्षकांनी माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. १९८९ नंतरच खऱ्या अर्थाने दिगंबर गणेश सराफ विद्यालयाचा सुवर्णकाळ सुरू झाला. नव्याने उभ्या राहात असलेल्या संस्थेत सुविधांचा अभाव असतानाही शिक्षकांनी घेतलेल्या परिश्रमाला विद्यार्थ्यांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद महत्त्वपूर्ण होता. इंग्रजी माध्यमांचे एवढे प्रस्थ नव्हते. त्यामुळे सराफ विद्यालयाला आपले मानून यामध्ये पालक विद्यार्थी यांची भूमिका महत्त्वाची ठरली असल्याची भावना राजेंद्र वेल्हाळ यांनी व्यक्त केली. प्राचार्य ए. टी. जोशी यांनी चांगले विद्यार्थी घडविताना उद्याचा नागरिक हे स्वप्न असते. माजी विद्यार्थी करीत असलेली यशस्वी वाटचाल ही समाधान देणारी असल्याचे सांगितले. 

क्रिडा शिक्षक प्रल्हाद आरोटे आणि राधाकृष्ण मेहेर यांनी हा स्नेह मेळावा आमचे तारुण्य वाढविणारा असल्याचे सांगितले. ३० वर्षांनी माजी विद्यार्थी बोलावतात, कृतज्ञता व्यक्त करतात, हा मोठा आनंददायी क्षण आहे. संस्थेसाठी पाठपुरावा करून मिळालेल्या क्रीडांगणावर विद्यार्थ्यांसमवेत खेळत राहील्यानेच आरोग्य चांगले राहिले. सांस्कृतिक उपक्रमातून मिळालेला उत्साह महत्त्वपूर्ण ठरल्याचा अनुभव त्यांनी सांगितला. योगाचार्य लेंडे यांनी आरोग्याच्या दृष्टीने योगाचे महत्त्व आपल्या भाषणात विषद केले. अशोक भारंबे, शहादेव हारेर यांनी विद्यार्थ्यांना सदिच्छा व्यक्त केल्या. 

माजी विद्यार्थी प्रसाद पायमोडे, प्रा. मिलींद गुंजाळ, प्रा. किरण शिंदे प्रा. अविनाश नवले, प्रा. स्वाती कोल्हटकर-देशमुख, उतर महाराष्ट्र विद्यापीठातील वैशाली मुर्तडक, सुनिता भोकनळ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. शाळेतील प्रथेप्रमाणे पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता झाली. ३० वर्षांपूर्वी भरणाऱ्या १० वी अ वर्गात प्रत्यक्ष जाऊन विद्यार्थ्यांनी आठवणी जागविल्या. कोअर कमिटीचे चेअरमन संदीप दारोळे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अविनाश गाडेकर, डॉ. अर्चना माचवे, अमित रघुवंशी, संदीप महाले, मनोज छाजेड, प्रा. अतिक कलादगी, शेजल शहा, दीपाली नेने, सोनाली रसाळ, राजश्री भट्टड, आरती मालपाणी, मुग्धा शहा, उमेश पालवे, संजय पाटणकर, विनोद वडनेरे, महेश जंगम, तुळशीराम मेहेर, आदी याप्रसंगी उपस्थित होते. ऋषिकेश कोळपकर यांनी सर्वाचे आभार मानले.